अखेर घरच्या मैदानावर खेळताना यू मुम्बाच्या संघाने आपला पहिला विजय साजरा केला आहे. हरियाणा स्टिलर्सच्या संघावर ३८-३२ अशी मात केली. या विजयासोबत यू मुम्बाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. यू मुम्बाने चढाई आणि बचावफळीत अष्टपैलू कामगिरी करत घरच्या मैदानावर आपला पहिला विजय मिळवला.

यू मुम्बाकडून आजच्या सामन्यात कर्णधार अनुप कुमारने चढाईत सर्वाधीक ८ गुणांची कमाई केली. त्याला मराठमोळ्या श्रीकांत जाधवने ६ तर काशिलींग अडकेने ४ गुण मिळवत तोलामोलाची साथ दिली. आजच्या सामन्यात अनुपने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ केलाच, मात्र त्याला श्रीकांत जाधवने दिलेली साथ ही अतिशय मोलाची ठरली. महत्वाच्या क्षणी डू ऑर डाय रेडमध्ये श्रीकांतने हरियाणाच्या महत्वाच्या बचावपटूंना बाहेरचा रस्ता दाखवला. श्रीकांतच्या खेळाने अनुपवरचा मोठा भार कमी झाला.

यू मुम्बाच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात आपल्या चढाईपटूंना तोलामोलाची साथ दिली. कुलदीप सिंहने सामन्यात बचावात ७ गुण मिळवले, हरियाणाच्या वझीर सिंह, विकास कंडोला यासारख्या चढाईपटूंना कुलदीपने आपल्या जाळ्यात ओढलं. उजवा कोपरारक्षक सुरिंदर सिंह आणि बदली खेळाडू हादी ओश्तनोक यांनी कुलदीपला चांगली साथ दिली. मात्र बचावात सुरिंदर सिंहने घाईघाईत खेळ करत हरियाणाला सामन्यात परतण्याची संधी दिली, मात्र अनुपने मुंबईची बाजू शेवटपर्यंत लावून धरत सामना मुंबईच्या बाजूने खेचला. सुरिंदरचा अतताईपणा यू मुम्बाला आगामी सामन्यात धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे बचावफळीतला खेळ मजबूत करणं हे मुम्बाच्या संघासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.

हरियाणाकडून विकास कंडोला, वझीर सिंह यांनी चढाईत प्रत्येकी ९ आणि ७ गुणांची कमाई केली. त्यांना बदली खेळाडू दिपक कुमार दहीयाने चांगली साथ दिली. मात्र बचावपटूंची निराशाजनक कामगिरी आजच्या सामन्यात हरियाणाच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरली. कर्णधार सुरिंदर नाडा, मोहीत छिल्लर यांना आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे चढाईपटूंनी केलेल्या मेहनतीवर हरियाणाच्या बचावपटूंनी आज पाणी फिरवलं असं म्हणायला हरकत नाही. घरच्या मैदानावर मिळालेल्या या विजयामुळे मुम्बाच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे. गुणतालिकेत सध्या यू मुम्बाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे, उद्या यू मुम्बाचा घरच्या मैदानावर अंतिम सामना जयपूर पिंक पँथर्सशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय संपादन करत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी पक्की करण्याचा मुम्बाच्या संघाचा प्रयत्न असणार आहे.