प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सर्वात महागडा कबड्डीपटू ठरणारा सिद्धार्थ देसाई पहिल्याच सामन्यात सपशेल अपयशी ठरला. यू मुंबाचा कर्णधार फझल अत्राचालीने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थविरुद्ध अचूक रणनीती वापरली. त्यामुळे यू मुंबाने यजमान तेलुगू टायटन्सचा ३१-२५ असा पराभव करीत शानदार विजयी सलामी नोंदवली.

गचीबोली इनडोअर स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात यू मुंबाने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले. सिद्धार्थची दुसऱ्याच चढाईत पकड करून यू मुंबाने त्याच्यावर दडपण आणले. त्यानंतर पहिल्या सत्रातील त्याची सहा चढायांपैकी चार वेळा पकड झाली. यापैकी एकदा तर त्याला सुपर चढाई असल्याचे स्पष्ट न झाल्यामुळे तो बाद झाला. यू मुंबाने १३व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सवर पहिला लोण चढवत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मग मध्यंतराला यू मुंबाकडे १७-१० अशी आघाडी होती.

दुसऱ्या सत्रात सातव्या मिनिटाला यू मुंबाने दुसरा लोण देत आघाडी २४-१३पर्यंत वाढवली. मग १०व्या मिनिटाला सिद्धार्थला पुन्हा मैदानावर आणण्यात आले. परंतु त्याच्या दोनदा पकडी झाल्या. मात्र शेवटच्या काही मिनिटांत त्याने पाच गुण मिळवले.

यू मुंबाकडून अभिषेक सिंगने (१० गुण) दिमाखदार चढाया केल्या, तर फझल (४ गुण) आणि संदीप नरवालने (४ गुण) लक्षवेधी पकडी केल्या. तेलुगू टायटन्सकडून रजनीशने (८ गुण) झुंजार खेळ केला.

आजचे सामने

  • बेंगळुरु बुल्स वि. गुजरात फॉच्र्युनजायंट्स
  • तेलुगू टायटन्स वि. तमिळ थलायव्हा
  • वेळ : सायंकाळी ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.