भारतीय क्रिकेट संघात अनेक खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे. मैदानावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी असलेलं एक नाव म्हणजे राहुल द्रविडचं. खेळपट्टीवर असताना द्रविडचा वावर आणि समोरच्या संघाला भांडावून सोडणारी त्याली फलंदाजी या गोष्टींमुळे त्याला ‘द वॉल’ आणि ‘मिस्टर रिलायबल’ म्हणूनही संबोधले जाऊ लागले.

विरोधी संघाच्या गोलंदाजांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या द्रविडकडे आजही मोठ्या आदरानं पाहिलं जातं. संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अवलियाने जगातील बऱ्याच प्रसिद्ध आणि पट्टीच्या गोलंदाजांनाही आपल्यापुढे शरणागती पत्करायला भाग पाडलं होतं. कसोटी सामन्यांसाठी द्रविडला बीसीसीआयच्या निवड समितीनेही नेहमीच पसंती दिली. पण, यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये तो कमी दिसू लागला होता. हा काळ लोटल्यानंतर द्रविडने यष्टीरक्षणाचं आव्हान पेलत भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केलं. यामध्ये त्याला फलंदाजीचीही जोड मिळाली. टी२० प्रकारात द्रविड फारसा चमकला नाही पण, आपल्या कारकिर्दीतील एकमेव टी२० सामन्यात त्याने सलग तीन षटकार मारत क्रीडारसिकांची दाद मिळवली होती.

३१ ऑगस्ट २०११ ला मॅंचेस्टरमध्ये इंग्लंडच्या संघाविरोधात हा सामना खेळला गेला होता. या टी२० सामन्यात द्रविडने २१ चेंडूंवर ३१ धावा केल्या होत्या. ‘द वॉल’ द्रविडच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या गोष्टीं जाणून घेण्यासाठी अनेकांनीच कुतूहलाची भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. चला तर मग, जाणून घेऊया..

फार कमी वयातच राहुल द्रविडने आपल्या अनोख्या फलंदाजीमुळे क्रिकेट जगतात नवी ओळख प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. तो १५, १७ आणि १९ वर्षांखालील कर्नाटक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी होता.

शालेय जीवनामध्ये द्रविड यष्टीरक्षणावर जास्त भर द्यायचा. पण, त्यानंतर त्याने फलंदाजीकडे मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळाले.
३ एप्रिल १९९६ मध्ये सिंगापूर येथे श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यातून द्रविडने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सामन्यात तो फक्त तीन धावांवर बाद झाला होता.

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर जून १९९६ मध्ये तो पहिल्या कसोटी सामना खेळला. या सामन्यात द्रविड ९५ धावांवर बाद झाल्यामुळे पहिल्याच कसोटी सामन्या शतक बवनण्याच्या विक्रमाला तो मुकला होता.

द्रविडने आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत खेळलेल्या १६४ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतकं, ६३ अर्धशतकांच्या बळावर १३२८८ धावा केल्या आहेत.

कसोटी सामन्यांमध्ये द्रविडने २१० झेल घेतले आहेत.

सचिन तेंडुलकरनंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १० हजारांहून जास्त धावा करणारा द्रविड हा दुसरा खेळाडू आहे.

कसोटी सामन्यांमध्ये द्रविडने पाच वेळा द्विशतकी खेळी खेळली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक २७० धावांच्या खेळीचा समावेश आहे.