दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राफेल नदालने माँटे कालरेपाठोपाठ बार्सिलोना स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करीत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. या जेतेपदासह नदालने ग्लुइर्मो व्हिलासच्या लाल मातीच्या कोर्टवर झालेल्या स्पर्धामधील ४९ जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. अंतिम लढतीत नदालने जपानच्या केई निशिकोरीवर ६-४, ७-५ अशी मात केली.
लागोपाठ दोन जेतेपदांसह ‘लाल मातीचा बादशाह’ असलेल्या नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. २०१४ नंतर नदालला एकाही एटीपी स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते. बार्सिलोना स्पर्धेचे नदालचे हे नववे जेतेपद आहे.