लाल मातीचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणारा आणि आठ वेळा जेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएम याच्यावर वर्चस्व गाजवत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. स्पेनचा डेव्हिड फेरर आणि सर्बियाची जेलेना जांकोविच यांनीही आपापले सामने सहज जिंकत आगेकूच केली आहे.
गतविजेता असूनही पहिल्या सामन्यात दुय्यम दर्जाच्या कोर्टवर खेळावे लागलेल्या नदालने दुसऱ्या सामन्यात रोलँड गॅरोच्या फिलिप चाट्रियर कोर्टवर पदार्पण केले. मात्र आपला झंझावाती फॉर्म कायम राखत नदालने थिएमवर ६-२, ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नदाल आणि २० वर्षीय युवा खेळाडू थिएम यांच्यात बहारदार फोरहँड खेळाचा नजराणा चाहत्यांना अनुभवता आला. आता पुढील फेरीत नदालला रशियाचा तेयमुराझ गाबाश्विली आणि अर्जेटिनाचा लिओनाड्रो मेयर यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागेल.
पाचव्या मानांकित फेररने दुसऱ्या फेरीत इटलीच्या सिमोन बोलेल्ली याचे आव्हान ६-२, ६-३, ६-२ असे परतवून लावले. गेल्या वर्षीच्या उपविजेत्या ठरलेल्या फेररने बोलेल्लीची पाच वेळा सव्र्हिस मोडीत काढली तर चार वेळा ब्रेकपॉइंट वाचवले. महिलांमध्ये, माजी विजेती रशियाची स्वेतलाना कुझनेट्सोव्हा हिने इटलीच्या कॅमिला जिओर्जी हिचा ७-६(५), ६-३ असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. कुझनेट्सोव्हाला पुढील फेरीत पाचव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हा आणि मारिना इराकोव्हिक यांच्यातील विजेतीशी लढत द्यावी लागेल. सहाव्या मानांकित जेलेना जांकोविकने जपानच्या कुरुमी नारा हिला ७-५, ६-० असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्स हिने पोलोना हेर्कोग हिला ६-१, ६-३ असे हरवले.
सानिया-कारा दुसऱ्या फेरीत
भारताची सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांनी महिला दुहेरीच्या सलामीच्या सामन्यात सुरेख खेळाचे प्रदर्शन करत स्लोव्हाकियाची डॅनिएला हन्तुचोव्हा आणि इस्रायलची शहर पीर या जोडीवर सहज मात करत दुसऱ्या फेरीत मजल मारली. सानिया-कारा जोडीने हा सामना ६-३, ६-३ असा जिंकला, मात्र रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार ऐसाम उल-हक कुरेशी यांचे आव्हान इस्रायलचा जोनाथन एल्रिच आणि ब्राझीलचा मार्सेलो मेलो यांनी ३-६, ४-६ असे संपुष्टात आणले. सानिया-कारा जोडीची पुढील फेरीत कॅनडाची गॅब्रिएला दाब्रोवस्की आणि पोलंडची अलिस्का रोसोलस्का यांच्याशी गाठ पडेल.