Chennai Super Kings vs Punjab Kings Highlights: चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सविरूद्ध शानदार कामगिरी करत २८ धावांनी सामना जिंकला. सीएसकेच्या गोलंदाजांनी कमाल करत संघाला विजय मिळवून दिला. पण या सामन्यात एक क्षण असा आला की स्टेडियममध्ये शांतता पसरली. तुफान फॉर्मात असलेला धोनी पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात मात्र पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हर्षल पटेलने माहीला क्लीन बोल्ड करत सर्वांनाच धक्का दिला. पण हर्षलने या मोठ्या विकेटनंतर सेलीब्रेशन केले नाही, यामागचे कारण विचारताच हर्षलने सर्वांची मनं जिंकली.
हर्षल पटेलने धोनीला केलं क्लीन बोल्ड
हर्षल पटेलने १९व्या षटकात शार्दुल ठाकूरला बाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूवर धोनी फलंदाजीला आला. धोनीलाही पटेलने पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले. धोनीला काही कळण्याआधीच चेंडूने त्रिफळा उडवला होता. चेन्नईचा संघ तेव्हा धावांसाठी झुंजत होता, धोनी आल्याने मोठी धावसंख्या उभारता येईल असे चाहत्यांना वाटले होते, पण हर्षलने यावर पाणी फेरले. या विकेटनंतर हर्षलने मोठं सेलिब्रेशन केलं नाही.
महेंद्रसिंग धोनीची विकेट घेतल्यानंतर हर्षलने फारसे सेलिब्रेशन केले नाही. जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो सामन्यानंतर म्हणाला, “मी त्याला आऊट केल्यानंतर सेलीब्रेशन केलं नाही. माझ्या मनात धोनीबद्दल खूप आदर आहे. या मैदानावर खेळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे चेंडू रिव्हर्स होतो. माझ्या पहिल्याच षटकात चेंडू रिव्हर्स होत होता. स्लो चेंडू टाकणं फायद्याचं ठरत होतं.
हर्षल पटेलने या सामन्यात गोलंदाजी करताना एकूण ३ विकेट घेतल्या. त्याने ४ षटकांत २४ धावा देत ३ मोठ्या विकेट मिळवल्या. पटेलने डॅरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी आणि शार्दुल ठाकूर बाद केले. या ३ विकेटसह परपल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेलने बुमराहची बरोबरी करत अव्वल स्थान गाठले.