भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. प्रत्येक संकटाला मात देत कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकावर असण्यासाठी आपली टीम पात्र आहे, असे शांस्त्रींनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक अपडेटनंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. या क्रमवारीमुळे शास्त्री खूष आहेत.

शास्त्री यांनी आपल्या संघासाठी एक ट्विट केले. ते म्हणाले, “संघाने प्रथम क्रमांकाचा मुकुट मिळविण्यासाठी दृढनिश्चय आणि एकाग्रतेचे उत्तम उदाहरण सादर केले. ही अशी एक गोष्ट आहे जी खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीमुळे मिळविली आहे. मध्ये काही नियम बदलले परंतु भारतीय संघाने आपल्या मार्गावरील प्रत्येक अडथळा दूर केला. माझे खेळाडू कठीण काळात कठोर क्रिकेट खेळले. मला या बिनधास्त संघाचा फार अभिमान आहे.”

 

२०१७पासून शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक

रवी शास्त्री २०१७पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कप २०१९नंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल वाढविण्यात आला. एकूण १२१ रेटिंगल गुणांसह भारत कसोटीत अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाने २४ सामन्यात २९१४ गुण मिळवले. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणाऱ्या न्यूझीलंडचे १२० रेटिंग गुण आहेत. त्यांचे १८ कसोटी सामन्यात एकूण २१६६ गुण आहेत.

मागील वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ आणि इंग्लंडला ३-१ असे पराभूत केले. दुसरीकडे, न्यूझीलंडने वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानला मात दिली. इंग्लंड १०९ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे ९४ रेटिंग गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहे, तर वेस्ट इंडीज ८४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर असून श्रीलंका आठव्या स्थानी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथम्प्टन येथे १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.