वृत्तसंस्था, माद्रिद रेयाल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी या दोन बलाढ्य संघांमधील चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याची लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. दोन्ही संघांचा आक्रमक खेळावर भर होता. अखेरीस ही रंगतदार लढत ३-३ अशी बरोबरीत संपली. उभय संघ पुढील आठवड्यात पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील लढतीत आमनेसामने येतील. ‘‘दोन्ही संघांनी मिळून सहा गोल केले. त्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन झाले असेल याची मला खात्री आहे,’’ असे सामन्यानंतर मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गॉर्डियोला म्हणाले. सिटीचा संघ आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याची लढत रेयालचे घरचे मैदान असलेल्या बेर्नेबाओ स्टेडियमवर झाली असली, तरी सिटीने आपल्या शैलीतच खेळ केला. सिटीला दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतर रेयालने दमदार पुनरागमन करताना पूर्वार्धात दोन गोल नोंदवले. उत्तरार्धातही दोन्ही संघांचा गोलधडाका कायम राहिला. सिटीने पाच मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत आघाडी मिळवली. परंतु काही मिनिटांतच माद्रिदने बरोबरी करण्यात यश मिळवले. हेही वाचा >>>IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य या लढतीत सिटीसाठी बेर्नार्डो सिल्वा (दुसऱ्या मिनिटाला), फिल फोडेन (६६व्या मि.) आणि जोस्को ग्वार्डिओल (७१व्या मि.) यांनी गोल नोंदवले. विशेष म्हणजे हे तिघांनीही गोलकक्षाबाहेरून अप्रतिम फटका मारत गोल केले. माद्रिदसाठी रुबेन डियाज (१२व्या मि.; स्वयंगोल), रॉड्रिगो (१४व्या मि.) आणि फेडेरिको वालवेद्रे (७९व्या मि.) यांनी गोल नोंदवले. आर्सेनलने बायर्नला रोखले चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील अन्य लढतीत आर्सेनलने बायर्न म्युनिकला बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. आर्सेनलच्या घरच्या मैदानावर झालेली पहिल्या टप्प्यातील लढत २-२ अशी बरोबरीत संपली. बुकायो साकाने (१२व्या मिनिटाला) आर्सेनलसाठी पहिला गोल केला. मात्र, सर्ज गनाब्रि (१८व्या मि.) आणि हॅरी केन (३२व्या मि.) यांनी केलेल्या गोलमुळे मध्यंतरापूर्वी बायर्नने आघाडी मिळवली. उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या लिआंड्रो ट्रिसार्डने (७६व्या मि.) आर्सेनलला बरोबरी करून दिली. आता उभय संघ पुढील आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील लढत खेळतील.