बायर्न म्युनिचवर मात; मार्को असेन्सिओचा निर्णायक गोल

म्युनिच : रेयाल माद्रिद आणि बायर्न म्युनिच यांच्यातील चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीची सर्वाना उत्सुकता लागली होती. मात्र ती उत्कंठा जेवढी तीव्र होती, तेवढी चुरस या सामन्यात अनुभवता न आल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. रेयाल माद्रिदने मार्को असेन्सिओच्या निर्णायक गोलच्या जोरावर यजमान म्युनिचचा २-१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवले आहे. रेयालचा गोलरक्षक कायले नव्हासने केलेल्या अप्रतिम बचावालाही या विजयाचे श्रेय द्यायला हवे.

ऑलियान्झ एरिनाना येथे झालेल्या लढतीत म्युनिचची बाजू मजबूत होती. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि जर्मनीचे विश्वविजेते प्रशिक्षक जोकीम लो यांची उपस्थिती म्युनिचच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी होती. सुरुवातीच्या २० मिनिटांत म्युनिचने तसा खेळ केलाही, मात्र आठव्या मिनिटाला प्रमुख खेळाडू अर्जेन रॉबेनची दुखापत म्युनिचची चिंता वाढवणारी ठरली. त्यामुळे रॉबेनला मैदान सोडावे लागले; परंतु २८व्या मिनिटाला जोशूआ किमिचने गोलरक्षक नव्हासला चकवून म्युनिचला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही क्लबकडून बराच काळ सावध खेळ खेळला गेला. त्यात जेरोम बोएटेंगच्या दुखापतीने म्युनिचच्या चिंतेत अधिक भर घातली. ४४व्या मिनिटाला मार्सेलोने डाव्या पायाने गोलजाळीच्या दिशेने टोलावलेल्या चेंडूने रेयालला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. रॉबर्ट लेवांडोवस्की आणि थॉमस म्युलर यांनी गोल करण्याची सोपी संधी गमावल्याने म्युनिचला पहिल्या सत्रात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी देणारा गोल झाला. यजमानांचा जयघोष करणारे संपूर्ण स्टेडियम ५७व्या मिनिटाला चिडीचूप झाले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या असेन्सिओने ल्युकास व्हॅझक्यूझच्या पासवर गोल करताना रेयालला २-१ असे आघाडीवर आणले. फ्रँक रिबेरीने बार्यनला बरोबरी मिळवून देण्याचे दोन प्रयत्न केले, परंतु नव्हासने कल्पकतेने ते हाणून पाडले. दुखापतीचा फटका माद्रिदलाही बसला. दुखापतग्रस्त काव्‍‌र्हाहलच्या जागी ६७व्या मिनिटाला करिम बेन्झेमाला पाचारण करण्यात आले. चॅम्पियन्स लीगमध्ये सलग ११ सामन्यांत गोल करणाऱ्या रेयालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची विक्रमी मालिका खंडित झाली. त्याने ७१व्या मिनिटाला गोल केला, परंतु चेंडूवर हाताने नियंत्रण मिळवून हा गोल केल्याचा निर्णय देत पंचांनी तो गोल अवैध ठरवला.

०५ बायर्न म्युनिचला पाच वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात रेयालला २-० अशा फरकाने पराभूत करावे लागेल. म्युनिचने २०१२-१३च्या हंगामात चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.

०३ रेयाल माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्याचा विक्रम खुणावत आहे. असा विक्रम यापूर्वी बायर्न म्युनिचने १९७४ ते ७६ या कालावधीत केला होता. रेयालने २०१६ व १७ मध्ये जेतेपद पटकावले आहे.