ला लिगा फुटबॉल स्पर्धा

‘ला लिगा’ स्पर्धेच्या जेतेपदासाठी बार्सिलोनासह रंगतदार चुरस
रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये प्रतिष्ठेच्या ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठीची चुरस आता अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या लढतीत रिअल माद्रिदने ग्रॅनडाचा ४-० असा धुव्वा उडवला. उर्वरित तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास रिअल माद्रिदला जेतेपदाची संधी आहे. अन्य लढतीत बार्सिलोनाने व्हिलारिअलला ४-१ असे नमवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. दोन्ही संघांचे ८४ गुण झाले आहेत, मात्र रिअलचे तीन तर बार्सिलोनाचे दोनच सामने बाकी आहेत. एकमेकांविरुद्धच्या लढतीत सरस सरासरीच्या बळावर बार्सिलोना गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. उर्वरित तीन लढती मिळून रिअल माद्रिदला सात गुणांची आवश्यकता आहे. सेव्हिला, सेल्टा व्हिगो आणि मलागा यांच्याविरुद्धच्या लढतीतून आवश्यक गुण मिळवल्यास पाच वर्षांनंतर रिअलचे ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.

रिअलचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी खेळाडूंना विश्रांती देण्याची पद्धत या ग्रॅनडाविरुद्धही कायम राखत संघात ९ बदल केले. रिअलचा आधारस्तंभ रोनाल्डो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. जेम्स रॉड्रिगेझने तिसऱ्या आणि अकराव्या मिनिटाला गोल केले तर अल्वारो मोटाराने ३०व्या आणि ३५व्या मिनिटाला गोल केले.

अ‍ॅटलेटिको माद्रिदने एबारला १-० असे नमवले. सौलने ६९व्या मिनिटाला एकमेव गोल केला. अ‍ॅटलेटिकोने गुणतालिकेत अव्वल चारमध्ये स्थान राखले.