ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेले. चहापानानंतर पाऊस न थांबल्याने अखेर दुसऱ्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द करावा लागला. तिसऱ्या दिवशी खेळ नियमित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या दोन बाद ६२ असून पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. शुबमन गिल अवघ्या सात धावा काढून माघारी गेला. रोहितने ४४ धावांची खेळी केली, पण तो देखील खराब फटका खेळत बाद झाला.

एक चांगली सुरूवात मिळाल्यानंतर रोहितला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. रोहित शर्माने ७४ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. त्यातील एका चौकाराची विशेष चर्चा रंगली. कॅमेरॉन ग्रीनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा फलंदाजी करत होता. कॅमेरॉन ग्रीनचा चेंडू त्याच्या पुढ्यात पडला. ते पाहताच रोहितने अतिशय सुंदररित्या तो चेंडू समोरच्या दिशेने टोलवला. चेंडू मारताना रोहितने जास्त ऊर्जा लावली नाही, पण त्याने फटका मारण्यासाठी साधलेली वेळ उत्तम ठरली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने स्वत: तो व्हिडीओ ट्विट करत त्याचं कौतुक केलं.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियाचाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१) व मार्कस हॅरिस (५) स्वस्तात माघारी परतले. स्मिथदेखील ३६ धावांवर बाद झाला. मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली. वेड ४५ धावांवर बाद झाला, तर मार्नस लाबूशेनने ९ चौकारांसह १०८ धावा केल्या. कर्णधार टीम पेनने अर्धशतक झळकावलं, पण कॅमेरॉन ग्रीन अर्धशतकानजीक (४७) असताना बाद झाला. त्यानंतर मिचेल स्टार्क (२०) आणि नॅथन लायन (२४) जोडीने थोडीशी झुंज दिली. पण त्यांचा डाव ३६९ धावांवर आटोपला.