फिफा विश्वचषकादरम्यान इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतल्यानंतर बंदीची शिक्षा सोसलेल्या लुइस सुआरेझच्या पुनरागमनाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण चार महिन्यांनंतर पुन्हा मैदानावर परतणाऱ्या सुआरेझचे बार्सिलोनातर्फे पुनरागमन मात्र अपयशी ठरले. नेयमारच्या गोलमुळे सुरुवातीला आघाडी मिळवूनही बार्सिलोनाला कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदकडून १-३ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या कामगिरीमुळे रिअल माद्रिदने मात्र ‘एल क्लासिको’ सामन्यावर आपले नाव कोरले.
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंचा भरणा असलेल्या या दोन्ही संघातील मुकाबल्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्यातच सुआरेझच्या समावेशामुळे बार्सिलोनाच्या खेळाडूंचा उत्साह उंचावला होता. नेयमारने चौथ्या मिनिटालाच गोल करून बार्सिलोनाचे खाते खोलले. मात्र युरोपियन विजेत्या रिअल माद्रिदने बार्सिलोनाला कडवी टक्कर देत घरच्या चाहत्यांसमोर सुरेख खेळाचे प्रदर्शन घडवले. ३५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल करत रिअल माद्रिदला बरोबरी साधून दिली. बार्सिलोनाने या मोसमातील स्वीकारलेला हा पहिला गोल
ठरला.
दुसऱ्या सत्रात पेपे आणि करिम बेंझेमा यांनी गोल करत रिअल माद्रिदला विजय मिळवून दिला. सर्व स्पर्धामध्ये रिअल माद्रिदचा हा सलग नववा विजय ठरला. रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांनी खेळाडूंची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘सुरुवातीलाच गोल पत्करल्यानंतर आम्ही डोके शांत ठेवण्यावर भर दिला. प्रत्येक आघाडय़ांवर आम्ही चांगला खेळ केला. विशेष म्हणजे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतरही आम्ही बार्सिलोनासारख्या मातब्बर संघाला हरवू शकलो.’’