यजमान ब्राझीलला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त ग्लोबो या वाहिनीने दिले आहे.
उपांत्य फेरीत जर्मनीकडून ७-१ आणि शनिवारी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नेदरलँड्सकडून ३-० अशी हार पत्करल्याच्या पार्श्वभूमीवर स्कोलारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
परंतू संघटनेकडून हा राजीनामा स्वीकारल्याचे कोणतेही वृत्त समजले नसल्याचेही ग्लोब वाहिनीने म्हटले आहे.
”जिंकणे आणि हरणे हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. मी माझ्या भवितव्याविषयी तुमच्याशी चर्चा करणार नाही.”, असं शनिवारी ब्राझीलने तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नेदरलँड्सकडून हार पत्करल्यानंतर पत्रकार परिषदेत स्कोलारी म्हणाले होते.