करुण नायर आणि मुरली विजय यांना भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे मध्यंतरी दोन्ही खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. निवड समितीकडून आपल्याला कोणत्याही गोष्टीची कल्पना देण्यात आली नसल्याचं दोन्ही खेळाडूंनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी हे आरोप फेटाळून लावताना, निवड समिती व संघ व्यवस्थापनात एकवाक्यता असल्याचं म्हटलं आहे. ते विंडिजविरुद्ध पहिल्या दोन वन-डे सामन्यांचा संघ घोषित करताना बोलत होते.

“संघ व्यवस्थापन आणि निवड समिती या दोघांमध्येही नेहमी एकवाक्यता आहे. संघ निवडीच्या प्रक्रियेबद्दल याआधी मी जे काही बोललो आहे त्यावर मी ठाम आहे.” प्रसाद यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या बैठकीत, प्रशासकीय समिती या वादात पडू इच्छित नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे प्रसाद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा वाद आता शमतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : विराटसोबतच्या सेल्फीसाठी त्याने भेदलं सुरक्षेचं कडं