फेडररची आगेकूच; सेरेना-शारापोव्हा समोरासमोर
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी पाच सेट संघर्ष करावा लागला. रॉजर फेडररसह सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
अव्वल मानांकित जोकोव्हिच जेतेपद कायम राखण्यासाठी आतुर आहे. गेल्या वर्षी झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या जोकोव्हिचने यंदाही दमदार सुरुवात केली आहे. मात्र गाइल्स सिमोनने जोकोव्हिचला संघर्ष करायला भाग पाडले. सिमोनविरुद्धच्या दहा लढतीत जोकोव्हिचने निर्भेळ यश मिळवले आहे. सिमोनवरील विजयासह जोकोव्हिचने सलग २७व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा विक्रमही नावावर केला. दहा ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या जोकोव्हिचने चार तास आणि ३२ मिनिटांच्या झुंजार लढतीत सिमोनवर ६-३, ६-७ (१-७), ६-४, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत जोकोव्हिचचा सामना केई निशिकोरीशी होणार आहे. अचूक आणि घोटीव खेळासाठी प्रसिद्ध जोकोव्हिचच्या हातून १०० चुका घडल्याने सिमोन खळबळजनक विजयाची नोंद करणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र चुकांतून बोध घेत जोकोव्हिचने पुनरागमन केले. सलग २६ सेट जिंकण्याचा पराक्रम नावावर असलेल्या जोकोव्हिचने या लढतीत दोन सेट गमावले.
तिशी ओलांडल्यानंतरही अद्भुत ऊर्जेसह खेळणाऱ्या रॉजर फेडररने डेव्हिड गॉफीनचे आव्हान ६-२, ६-१, ६-४ असे सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले.
अटीतटीच्या लढतीत टॉमस बर्डीचने रॉबटरे बॉटिस्टा ऑगटवर ४-६, ६-४, ६-३, १-६, ६-३ असा विजय मिळवला. ऑगटविरुद्धच्या सहा लढतीतला बर्डीचचा हा चौथा विजय आहे.
अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने सलग १२व्या विजयाची नोंद करताना अ‍ॅना लेना फ्राइडसमवर ६-७ (६-८), ६-१, ७-५ अशी मात केली. चौथ्या मानांकित रडवानस्काने पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर भेदक सव्‍‌र्हिस, फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या बळावर विजय मिळवला. सौंदर्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने स्वित्र्झलडच्या प्रतिभावान बेनिंडा बेनकिकला ७-५, ७-५ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अचूक सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध बेनकिकने शारापोव्हाला विजयासाठी झगडायला लावले. अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने मार्गारिटा गॅसपायरनचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत सेरेना आणि शारापोव्हा समोरासमोर असणार आहेत. या लढतींमध्ये सेरेना १८-२ अशी आघाडीवर आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर स्लॅमचा विक्रम हुकलेली सेरेना नव्या वर्षांची सुरुवात जेतेपदाने करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पेस, बोपण्णाची आगेकूच
लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी मिश्र दुहेरी प्रकारात विजयी सलामी दिली. पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना अ‍ॅनास्ता पॅव्हल्युचेनकोव्हा आणि डेव्हिड इन्गलोत जोडीवर ६-३, ७-५ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत पेस-हिंगिस जोडीची लढत स्लोअन स्टीफन्स आणि जीन ज्युलियन रोजर जोडीशी होणार आहे. रोहन बोपण्णाने युंग जान चानसह खेळताना जॉन मिलमन आणि किंबर्ली बिरेल जोडीवर ७-५, ६-१ अशी मात केली. बोपण्णा-जान जोडीचा सामना आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युकाझ क्युबोट जोडीशी आहे. पुरुष दुहेरी प्रकारात बोपण्णा-मर्गेआ जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रेट ह्युे आणि मॅक्स मिर्नी जोडीने बोपण्णा-मर्गेआ जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला.