भारताचा सलामीचा फलंदाज आणि आक्रमक फटकेबाजी करणारा खेळाडू शिखर धवन श्रीलंका दौऱ्यातून माघारी फिरणार आहे. शिखर धवनच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे तो पाचवा एक दिवसीय सामना आणि ६ सप्टेंबरला होणारा टी २० सामना सोडून भारतात परतणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी भारतात परतणार आहे.

शिखर धवनच्या जागी पाचवा एक दिवसीय सामना कोण खेळणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. सध्या शिखर धवनच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. येत्या काही दिवसात त्यांची प्रकृती ठणठणीत होईल अशीही अपेक्षा आहे. मात्र शिखर धवन आपल्या आईसाठी भारतात परतणार आहे. शिखरच्या जागी इतर कोणत्या फलंदाजाची निवड केली जाणार नाही असा निर्णय ऑल इंडिया सिनियर सिलेक्शन कमिटीने घेतला आहे. दि. ३ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे, तर ६ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांमध्ये टी २० चा सामना होणार आहे.

याआधी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेले चार सामने भारतानेच जिंकले आहेत. चौथ्या एक दिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी करून श्रीलंकेपुढे धावांचा डोंगर उभा केला. मनिष पांडे आणि महेंद्रसिंह धोनी यांनीही श्रीलंकेविरोधात मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावला. आता याच टीममधील आक्रमक खेळाडू असलेला शिखर आपल्या आईसाठी भारतात परतणार आहे. या बातमीमुळे क्रिकेट रसिक काहीसे नाराज होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.