ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषणा केली. इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने निवड केलेल्या संघामधून पीटर हँड्सकाँब आणि जोश हेझलवूडला डच्चू देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र हँड्सकाँब आणि हेझलवूडबरोबरच इतर महत्वाच्या चार खेळाडूंनाही संघात स्थान न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वगळलेल्या सहा कमनशिबी खेळाडूंबद्दल…

पीटर हँड्सकाँब

स्मिथ आणि वॉर्नरला संघात स्थान देण्यात आल्याने हँड्सकाँबला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या हँड्सकाँबने जानेवारीपासून खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ४३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

जोश हेझलवूड

दुखापतीमुळे हेझलवूडला आराम दिला असून ऑगस्टमध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेच्या दृष्टीने त्याला तयार होण्यासाठी विश्रांती देण्याच्या दृष्टीने त्याची निवड करण्यात आलेली नसल्याचे समजते. दुखापतग्रस्त हेझलवूडला अनेकदा संघाबाहेर बसावे लागले. त्यातच पॅट कमिन्स, झाय रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाइल, मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे.

अॅश्टन टर्नर

धडाकेबाज फलंदाज अॅश्टन टर्नरलाही विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. नुकतीच भारताविरुद्ध झालेल्या मालिकेतील मोहाली येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात टर्नरने ८४ धावांची तुफानी खेळी करत धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवला होता. टर्नर च्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने ३५८ धावांचा यशस्वी पाठलाग करत चौथा सामना जिंकला होता.

केन रिचर्डसन

हेझलवूड प्रमाणेच गोलंदाजीच अनेक पर्याय उपलब्ध असल्याने रिचर्डसनला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. मागील १८ महिन्यांमध्ये रिचर्डसनला जेव्हा जेव्हा संधी देण्यात आली त्याने संधीचे सोने केले. मात्र निवडण समितीने रिचर्डसनऐवजी नॅथन कुल्टर-नाइल आणि जेसन बेहरनडॉर्फ यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.

मॅथ्यू वेड

यष्टीरक्षक म्हणून अॅलेक्स केरीला संधी देण्यात आल्याने मॅथ्यू वेडचा पत्ता कट झाला. अॅलेक्स केरीपेक्षा मॅथ्यू वेडकडे फटक्यांची जास्त वैविध्यता आहे. तरीही मागील हंगामामध्ये अॅलेक्स केरीने यष्ट्यांमागील कामगिरीबरोबरच फलंदाजीतही चमक दाखवल्याने त्यालाच विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे.

डार्सी शॉर्ट

बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत सलग दोनदा मालिकावीर पुरस्कार आणि जेटीएल या ऑस्ट्रेलियातील घरगुती क्रिकेट स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतरही शॉर्टला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शॉर्ट शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या वाईट कामगिरीनंतर निवड समितीने संपूर्ण संघच बदलल्याने शॉर्टला पुन्हा संधी मिळाली नाही.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ खालीलप्रमाणे

अॅरॉन फिंच (कर्णधार)
जेसन बेहरनडॉर्फ
अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक)
नॅथन कुल्टर-नाइल
पॅट कमिन्स
उस्मान ख्वाजा
नेथन लॉयन
शॉन मार्श
ग्लेन मॅक्सवेल<br />झाय रिचर्डसन
स्टीव्ह स्मिथ
मिचेल स्टार्क
मार्कस स्टॉयनिस
डेव्हिड वॉर्नर
अॅडम झॅम्पा