बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत माजी क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले आहे. या प्रकरणानंतर सुनिल गावस्कर यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त केले. बीसीसीआयकडे खूप काही करण्याची क्षमता आहे जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली हे नाव माझ्या मनात येतं, असे गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी आपले मत पटवून देताना एक उदाहरण देखील दिले. १९९९-२००० सालात जेव्हा संघावर मॅच फिक्सिंगचे संकट होते तेव्हा गांगुलीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती आणि गांगुलीने सर्व बदलून दाखवले, असे गावस्कर म्हणाले.

वाचा: बीसीसीआयमध्ये आता ‘दादागिरी’, सौरव गांगुलीकडे अध्यक्षपद?

 

सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी नाव सुचविण्याची जबाबदारी न्यायमित्र फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांच्याकडे सोपवली आहे. यातील फली नरिमन यांनी बीसीसीआयच्या या वादातून माघार घेतली असून नरिमन यांच्या जागी अनिल दीवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

वाचा: न्यायमित्र फली नरिमन यांची ‘बीसीसीआय’च्या वादातून माघार

बीसीसीआय संदर्भातील आतापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचेही गावस्कर म्हणाले. अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविण्यात आल्यानंतर सध्या बीसीसीआयची जबाबदारी उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिवांकडे देण्यात आली आहे.