भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी(बीसीसीआय) नव्या वर्षाची सुरूवात धक्कादायक झाली. सुप्रीम कोर्टाने सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले. याशिवाय, कोर्टात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देखील या दोघांना देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करायची यासाठी सुप्रीम कोर्टाने न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नियुक्ती केली आहे. अनुराग ठाकूर यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता बीसीसीआयची जबाबदारी कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झाली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचा समावेश होतो. तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील गांगुली चांगली कामगिरी करत आहे.

वाचा: निवृत्त न्यायाधीशांकडून भारतीय क्रिकेटचे भले होवो – ठाकूर

 

गांगुलीसोबतच पश्चिम झोनचे उपाध्यक्ष टी.सी.मॅथ्यू आणि गौतम रॉय देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव ब्रिजेश पटेल यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमांनुसार अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचे नाव योग्य असल्याचे म्हटले जात आहे. गांगुली स्वत: माजी क्रिकेटपटू असल्याने त्याची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. गांगुलची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर तो बीसीसीआयचा ३८ वा अध्यक्ष ठरेल.

झारखंड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आणि बीसीसीआयचे सध्याचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी हे अजय शिर्के यांची जागा घेऊ शकतात असेही सांगितले जात आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार असून न्यायमित्र कोर्टात कोणती नावे सुचवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, भारतीय संघ येत्या १५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.