भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सरावाशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ दोन दिवसीय सराव सामना खेळणार होता. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेड मंडळाने सराव सामना रद्द केला आहे. भारतीय संघाने सराव सामन्याऐवजी प्रशिक्षणावर भर देण्याचा पर्याय निवडल्यामुळे सराव सामना रद्द करण्यात आल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले.

कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ युरोलक्स बोलँड पार्कच्या मैदानावर सराव सामना खेळण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील  भारतीय संघातील खेळाडूंनी प्रशिक्षणावर भर देण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वर्षातील पहिल्या मालिकेत भारतीय संघ सरावाशिवाय मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिराज, आवेश खान, नवदीप सॅनी आणि बासिल थंपी हे युवा गोलंदाज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांविरुद्ध नेट प्रॅक्टिसमध्ये या चौघांच्या गोलंदाजीवर सराव फायदेशीर ठरेल, असे बीसीसीआयला वाटते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन डे मालिकेतील दिवस रात्रीच्या सामन्यात देखील बदल करण्यात आले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ जानेवारीपासून केपटाऊनच्या मैदानात रंगणार आहे. तर १३ आणि २४ जानेवारीला अनुक्रमे सेंच्चुरियन आणि जोहन्सबर्ग मैदानात कसोटी सामने खेळवण्यात येतील. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे.