मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला आहे. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान दिलेल्या भारतीय संघाने आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळच दिला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५, रविंद्र जाडेजाने ४ तर आश्विनने १ बळी घेतला. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ३२३ धावांवर घोषित केला. आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान दिल्यानंतर भारताने चौथ्या दिवशी, आफ्रिकेचा पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गरला झटपट माघारी धाडलं. रविंद्र जाडेजाने एल्गरला पायचीत पकडत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

अखेरच्या दिवशी कसोटी सामना वाचवण्यासाठी आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर आफिकेचे फलंदाज तग धरुच शकले नाहीत. नाईट वॉचमन डे-ब्रूनला माघारी धाडत आश्विनने अखेरच्या दिवशी भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर मोहम्मद शमीने बावुमाचा शून्यावर त्रिफळा उडवला.

यानंतर कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि एडन मार्क्रम यांनी छोटेखानी भागीदारी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमीचा टप्पा पडून आत येणारा चेंडू आफ्रिकेचा कर्णधार डु-प्लेसिसच्या लक्षातच आला नाही. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, केशव महाराज हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. पिडीट आणि मुथुस्वामी यांनी अखेरच्या षटकांमध्ये भागीदारी रचत भारताचा विजय लांबणीवर टाकला.

अखेरच्या दिवशी उपहारापर्यंतच्या सत्रानंतर आफ्रिकेचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात ११७ धावांपर्यंत पोहचला होता. उपहारानंतरही पिडीटने नेटाने फलंदाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं. नवव्या विकेटसाठी पिडीट आणि मुथुस्वामी यांनी ९१ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. अखेरीस मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पिडीटच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला आणि आफ्रिकेची जमलेली जोडी फुटली. पिडीटने १०७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर रबाडाला यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून झेलबाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Live Blog

13:54 (IST)06 Oct 2019
आफ्रिकेचा अखेरचा गडी माघारी, भारत सामन्यात विजयी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर वृद्धीमान साहाने घेतला रबाडाचा झेल

शमीचे दुसऱ्या डावात ५ बळी, भारत २०३ धावांनी विजयी. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर

13:27 (IST)06 Oct 2019
अखेर आफ्रिकेची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश

पिडीट मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी

नवव्या विकेटसाठी पिडीटची मुथुस्वामीसोबत ९१ धावांची भागीदारी, पिडीटच्या १०७ चेंडूत ५६ धावा

13:03 (IST)06 Oct 2019
पिडीट-मुथुस्वामी जोडीची झुंज सुरुच

दोन्ही फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना. पिडीटचं अर्धशतक

नवव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी

11:57 (IST)06 Oct 2019
आफ्रिकेच्या तळातल्या फलंदाजांची झुंज, भारताचा विजय लांबणीवर

मुथुस्वामी आणि पिडीट या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा सामना करत आफ्रिकेचा पराभव पुढे ढकलला आहे.

चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ११७/८

10:56 (IST)06 Oct 2019
केशव महाराजही लागोपाठ माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत, भारत विजयाच्या समीप

10:52 (IST)06 Oct 2019
त्याच षटकात फिलँडर माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का

रविंद्र जाडेजाने घेतला बळी, आफ्रिकेची पराभवाच्या दिशेने वाटचाल

10:49 (IST)06 Oct 2019
आफ्रिकेचा अखेरचा झुंज देणारा फलंदाज माघारी परतला

एडन मार्क्रम माघारी, रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर एका हातात घेतला मार्क्रमचा झेल

10:35 (IST)06 Oct 2019
आफ्रिकेची पडझड सुरुच, क्विंटन डी-कॉक माघारी

मोहम्मद शमीचा दुसऱ्या डावात धडाका सुरुच, पहिल्या डावातील शतकवीर क्विंटन डी-कॉकचा त्रिफळा उडवला

आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी परतला

10:27 (IST)06 Oct 2019
आफ्रिकेला मोठा धक्का, कर्णधार डु प्लेसिस माघारी

मोहम्मद शमीचा टप्पा पडून आता येणारा चेंडू डु-प्लेसिसला कळलाच नाही, ऑफ स्टम्प उडून आफ्रिकेचा कर्णधार माघारी

आफ्रिकेची एडन मार्क्रम-डु-प्लेसिस जोडी फोडण्यात भारताला यश

09:43 (IST)06 Oct 2019
दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात, बावुमा माघारी

मोहम्मद शमीने उडवला बावुमाचा त्रिफळा, आफ्रिकेची आघाडीची फळी तंबूत

09:39 (IST)06 Oct 2019
सुरुवातीच्याच षटकांमध्ये भारताला पहिलं यश

थेनूस डी-ब्रून रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत

अवश्य वाचा - Ind vs SA : रविचंद्रन आश्विनची मुरलीधरनच्या कामगिरीशी बरोबरी