चारदिवसीय कसोटीला विरोध

हॉकआय तंत्रज्ञानाशिवाय उपलब्ध असलेल्या पंच पुनर्आढावा पद्धत अंगीकारण्यासाठी अनुकूल असल्याचे मत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. पंचपुनर्आढावा पद्धत लागू झाल्यापासून बीसीसीआयचा या यंत्रणेला विरोध आहे. मात्र आता बीसीसीआयने आपल्या भूमिकेत बदल केला आहे. मात्र चार दिवसीय कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या द्विस्तरीय प्रशासनाला बीसीआयचा पाठिंबा नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

‘काही अटींसह पंचपुनर्आढावा पद्धतीला पाठिंबा आहे. या पद्धतीनुसार निर्णयांची अचूकता वाढवण्यासाठी काही तंत्रज्ञान अमलात आणता येईल मात्र हॉक आय नसावे. हॉटस्पॉट आणि रिअल टाइम स्निको यंत्रणेलाही होकार आहे. हॉक आय तंत्रज्ञान शंभर टक्के अचूक निर्णय देत नाही आणि ते सिद्ध झाले आहे. सर्वसमावेशक स्वरुप नसलेल्या तंत्रज्ञानाला होकार देणे योग्य नाही’, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

कसोटी क्रिकेटला सक्षम पर्याय आपल्यासमोर नाही. अशा परिस्थितीत पूर्णपणे विकसित नसलेला पर्याय अंगीकारून खेळाचा काय फायदा? त्यामुळे चार दिवसीय कसोटीचा पर्याय आजमवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कसोटी सामन्यांना प्रेक्षक मिळवून देणे हे उद्दिष्ट असायला हवे. कसोटी सामन्याचा कालावधी हा मुद्दा नाही. रंजकता वाढली तर प्रेक्षक कसोटी सामन्यांकडे वळतील.

मिनी आयपीएल</strong>तूर्तास लांबणीवर

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर अमेरिकेत ‘मिनी आयपीएल’ स्पर्धा खेळविण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तूर्तास लांबणीवर टाकल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले,‘ तेथील वेळेचा फरक जाणून घ्यायला हवा. भारतात आयपीएल सायंकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत खेळवण्यात येते. त्यामुळे अमेरिकेत पूर्व प्रांतात ही स्पर्धा खेळविणे सोयीस्कर ठरेल. अमेरिकेत दिवसा सामने खेळविण्यात आले तर भारतात ते सायंकाळी दिसतील. यात प्रक्षेपणाचा महत्त्वाचा वाटा आहे. घरच्या प्रेक्षकांना गमावून चालणार नाही. त्यामुळे तसा प्रांत शोधणे, हे मोठे आव्हान आहे.’