आयपीएलच्या दहाव्या पर्वासाठीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून आता खेळाडूंच्या दरांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणं घेत संघमालक त्यांच्या परिने खेळाडूंची निवड करत आहेत. याच लिलावप्रक्रियेदरम्यान फिरकी गोलंदाजांच्या लिलावाच्या सुरुवातीलाच काहीसे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.फिरकी गोलंदाजांच्या यादीत पहिले नाव घेत न्यूझीलंडच्या इश सोधी या खेळाडूच्या नावाचा पुकार करण्यात आला. पण, या लिलावात इश सोधी अनसोल्ड राहिला. इश सोधीच्या नावाचा पुकार करताना लिलाव कर्त्यांनी खेळाडूचा क्रमांक आणि खेळाडूचे नाव यांची घोषणा करताना काहीशी गफलत केली. त्यामुळे त्या क्षणी सुरु असलेला लिलाव रद्द करण्यात आला.

रद्द झालेल्या लिलावानंतर काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा लिलावप्रक्रियेला सुरुवात झाली असून उर्वरित खेळाडूंवर संघमालक बोली लावत आहेत. दरम्यान, दहा वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील हा अखेरचा लिलाव आहे. पुढील वर्षी सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. एक संघ जवळपास २७ खेळाडूंना चमूत दाखल करून घेऊ शकतो. मात्र बहुतेक संघमालकांनी २२ ते २४ खेळाडूंचा चमू बनवण्यातच धन्यता मानली आहे. १० लाख ते २ कोटींपर्यंत पायाभूत किंमत असलेले खेळाडू लिलावासाठी उपलब्ध आहेत.

मार्टिन गप्तीलच्या लिलावाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली, पण गप्तीलवर कोणत्याही संघाने बोली लावलीच नाही. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून वीरेंद्र सेहवागने इंग्लंडच्या इऑन मॉर्गनला दोन कोटींच्या बोलीसह संघात दाखल करून घेतले. भारताच्या इशांत शर्मावर २ कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आली असतानाही त्यात एकाही संघाने रस दाखवलेला नाही. ट्रेंड बोल्टवर २ कोटींची बोली लावून कोलकाताने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. बंगळुरू येथे सुरू असलेल्या या लिलावात आठ संघ ३५० हून अधिक खेळाडूंमधून १४८.३३ कोटी रुपयांचा वर्षाव करून खेळाडूंची निवड सुरू आहे.

IPL Player Auction 2017 Live Updates : इशांत शर्मावर कोणत्याही संघाकडून बोली नाही