India vs Afghanistan U19 Asia Cup, 2023 : दुबईत चालू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून मात केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासोर १७४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघाने अफगाणिस्तानचं हे आव्हान ३७.३ षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं. अर्शीन कुलकर्णीने या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू खेळी करत विजय मिळवून दिला. अर्शीनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना अफगाणिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यापाठोपाठ धावांचा पाठलाग करताना नाबाद ७० धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निर्धारित ५० षटकांमध्ये भारताने अफगाणिस्तानला १७३ धावांवर रोखलं. भारताकडून अर्शीनने ८ षटकांत २९ धावा देत ३ बळी घेतले. राज लिंबानी याने १० षटकांत ४८ धावा देत ३ बळी घेतले. तर, नमन तिवारीने २ बळी घेतले. मुरुगन अभिषेक आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचा संघ केवळ १७३ धावा करू शकला. अफगाणिस्तानकडून जमशेद जादरान याने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर मोहम्मद युनूसने २६ आणि नोमन शाहने २५ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कुठल्याही अफगाणिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

अफगाणिस्तानने दिलेलं १७४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून अर्शीन कुलकर्णी याने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. सलामीला मैदानात आलेल्या अर्शीनने १०५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. त्याला मुशीर खानने नाबाद ४८ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. सलामीवीर आदर्श सिंह (१४), रुद्र पटेल (५) आणि कर्णधार उदय सहारन (२०) यांना फार मोठी खेळी करता आली नाही.

या स्पर्धेतील भारताचा पुढचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. १० डिसेंबर रोजी दुबईत हा सामना खेळवला जाईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी भारत विरुद्ध नेपाळ असा सामना खेळवला जाईल.

हे ही वाचा >> AUS vs PAK Test : ना षटकार, ना चौकार, तरी एका चेंडूवर दिल्या सात धावा, पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा VIDEO व्हायरल

सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने यापूर्वी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत या अष्टपैलू खेळाडूवर सर्वाचं लक्ष असेल. अर्शीन असाच खेळत राहिला तर लवकरच त्याच्यासाठी टीम इंडियाचे (वरिष्ठ संघ) दरवाजे उघडतील अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U19 asia cup 2023 india beats afghanistan with arshin kulkarni all round performance asc