जगातील अत्यंत नामवंत बॅडमिंटनपटूंचा खेळ पाहण्याची संधी भारतीयांना पुढील वर्षी मिळणार आहे. उबेर व थॉमस चषक जागतिक स्पर्धेची मुख्य फेरी आयोजित करण्याचा मान भारतास मिळाला आहे.
ही स्पर्धा नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट क्रीडा संकुलात १८ ते २५ मे २०१४ या कालावधीमध्ये आयोजित केली जाईल. भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष अखिलेष दासगुप्ता यांनी ही माहिती दिली. या वेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे उपाध्यक्ष पाईसन रंगसीकितफो हेही उपस्थित होते.
पुरुष गटासाठी १९४८-४९ पासून थॉमस चषक स्पर्धा आयोजित केली जाते तर महिलांकरिता १९५६-५७ पासून उबेर चषक स्पर्धा आयोजित केली जाते. या दोन्ही स्पर्धा सांघिक विजेतेपदासाठी घेतल्या जातात. पुढील वर्षीपासून या स्पर्धा नवीन पद्धतीने होणार आहेत.
 प्राथमिक फेरीचे सामने घेतले जातील व त्यामधून दोन्ही गटाकरिता प्रत्येकी चौदा संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याखेरीज गतविजेता संघ व यजमान संघ असे दोन संघही मुख्य फेरीकरिता पात्र ठरतील.
बॅडमिंटनमधील पंचांची रिव्ह्य़ु पद्धत पुढील महिन्यात मलेशियात होणाऱ्या सुदिरमन चषक स्पर्धेच्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली जाईल.