विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. टी २० मालिकेत मात्र त्याची निवड झालेली नाही. त्यामुळे गेल सध्या कॅनडा मध्ये सुरु असलेल्या टी २० लीगमध्ये खेळतो आहे. या स्पर्धेत तो दमदार कामगिरी करत आहे. नुकतीच त्याने एका सामन्यात शतकी धमाका केला. कॅनडा लीगमध्ये गेलने ५४ चेंडूत तब्बल १२२ धावा चोपल्या. या खेळीत त्याने १२ षटकार आणि ७ चौकार लगावले. गेलच्या तुफानी खेळीच्या बळावर व्हॅनकुव्हर नाईट्स या संघाकडून खेळताना गेलने ही कामगिरी केली.

गेलच्या कामगिरीच्या जोरावर व्हॅनकुव्हर नाईट्स संघाने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २७६ धावा चोपल्या. नाणेफेक गमावल्यानंतर व्हॅनकुव्हर नाईट्सचे सलामीवीर टॉबिएस विसी आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या विकेटसाठी ४.३ षटकातच ६३ धावांची सलामी दिली. विसीने १९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार लगावत ५१ धावा केल्या. गेल आणि रॉस डुसेन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. डुसेननेही दमदार कामगिरी केली आणि २५ चेंडूत ५६ धावा केल्या. गेलने नाबाद १२२ धावांची खेळी केली.

गेलने केलेल्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने मॅन्ट्रियल टायगर्सच्या विरुद्ध २७६ धावांचा डोंगर उभा केला. मात्र तरीदेखील त्यांना विजय मिळवता आला नाही. खराब हवामानामुळे दुसरा डाव झालाच नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आले.