क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा मैदानात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये वाद होतात, तर काही वेळा एखादा खेळाडू थेट अंपारशीच वाद घालतो. असे अनेक चित्रविचित्र किस्से क्रिकेटच्या मैदानावर घडत असतात. मात्र नुकताच क्रिकेटच्या मैदानावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

ऑस्ट्रेलियात सध्या स्थानिक क्लब क्रिकेटमधील शेफील्ड शिल्ड स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील क्वीन्सलँड विरूद्ध साऊथ ऑस्ट्रेलिया सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होता. मार्क स्टीकेटी या वेगवान गोलंदाजाने लियम स्कॉट या फलंदाजांला बाऊन्सर चेंडू टाकला. उसळता चेंडू चुकवण्यासाठी लियमने डोकं चेंडूच्या रेषेतून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू इनस्विंग झाला आणि थेट त्याच्या हेल्मेटवरच आदळला. चेंडू हेल्मेटवर आदळताच लियम जमिनीवर कोसळला.

पाहा व्हिडीओ…

लियम जमिनीवर कोसळल्यानंतर मैदानात लगेच वैद्यकीय समितीचे सदस्य आले. मात्र दुखापत फारशी मोठी नसल्याने लियम पुन्हा फलंदाजीसाठी उभा राहिला. स्टीकेटीने पुढचा चेंडू पुन्हा आखूड टप्प्याचा टाकला. पण हा चेंडू तितका उडला नाही आणि लियम इनस्विंगिंग चेंडूवर त्रिफळाचीत झाला. दरम्यान, या सामन्यात क्वीन्सलँड संघाने साऊथ ऑस्ट्रेलिया संघावर ६२ धावांनी विजय मिळवला.