Mohammad Amir says he would like to play under the leadership of Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची जगभरात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. मग तो भारत असो वा शेजारी देश पाकिस्तान. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा विराट कोहलीचे कौतुक केले आहे. याआधीही मोहम्मद आमिरने अनेकदा पाकिस्तानी मंचावर विराट कोहलीची उघडपणे प्रशंसा केली आणि त्याला जगातील महान फलंदाज म्हटले. आता पुन्हा एकदा आमिरने विराट कोहलीची प्रशंसा केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यूएईच्या आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमधील डेझर्ट वायपर्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे तीन खेळाडू बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत शोएब मलिक हा मोहम्मद आमिर आणि शाहीन शाह आफ्रिदीची मुलाखत घेत असताना दिसत आहे. यामध्ये बरेच प्रश्न हे भारतीय क्रिकेटपटूंशी निगडीत होते.

मोहम्मद आमिरने या मुलाखतीत सांगितले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा त्याचा आवडता संघ आहे. यासह जेव्हा आमिर आणि शाहीनला विचारण्यात आले की विराट आणि बाबरमधील कोणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्कृष्ट आहे, तेव्हा येथे शाहीनने बाबरचे नाव घेतले पण येथेही मोहम्मद आमिरने विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले.त्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात कोणाच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला, तेव्हा आमिरने उत्तर दिले की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले ‘अनोखे शतक’

यासोबतच मोहम्मद आमिरने रोहित शर्माच्या पुल शॉटला जगातील सर्वोत्तम पुल शॉट म्हटले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने विराट कोहलीचे इतक्या उघडपणे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एवढेच नाही तर तो कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणतो. मोहम्मद आमिरही त्याच्या फिटनेसचा चाहता आहे.