भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. आता भारताची वेस्ट इंडिज विरूद्ध क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. ६ डिसेंबरपासून टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.

बांगलादेश विरूद्धच्या संघात वृद्धिमान साहाला संधी देण्यात आली होती. कामगिरीत सातत्य राखणं शक्य न झाल्याने पंतला संघातून वगळण्यात आले होते. पण आगामी वेस्ट इंडिज विरूद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले आहे. नुकतेच माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी ऋषभ पंतबाबत महत्त्वाचे विधान केले होते. तशातच विराट कोहलीने देखील ऋषभ पंतची पाठराखण केली आहे.

एखादा खेळाडू फॉर्मबाबत झगडत असेल तर त्याला त्याचा वेळ देणे ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे. ऋषभ पंत हा चांगला खेळाडू आहे. तो नवोदित आहे. त्यामुळे त्याच्यावर टोकाची टीका करणं योग्य नाही. याउलट सर्व चाहत्यांनी ऋषभ पंतला त्याचा खेळ सुधारण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. जर ऋषभ पंतने एखाद्या वेळी बाद करण्याची संधी दवडली किंवा मैदानावर खेळाताना एखादी चूक केली तर लगेच स्टेडियममधून धोनीच्या नावाचा जयघोष करणे बरोबर नाही. असं वागणं म्हणजे मैदानावर असलेल्या ऋषभ पंतचा अपमान आहे. कोणत्याही खेळाडूला ही गोष्ट रुचणार नाही.

तुम्ही देशासाठी मैदानावर खेळत असता, घाम गाळत असता. अशा वेळी मी काय चूक केली याचा विचार करण्यापेक्षाही तुम्हाला साऱ्यांनी पाठिंबा देणे अपेक्षित असते. टीकेचा धनी होणे कोणालाही आवडत नाही. पण जेव्हा तुम्ही अशी एखादी चूक करता तेव्हा त्या क्षणाला इतर खेळाडूशी तुमची तुलना होणे कोणालाही आवडणार नाही, असेही विराट म्हणाला.