विराट कोहलीच्या नेतृत्त्वात येत्या काळात भारतीय कसोटी संघ वर्चस्व गाजवेल असा विश्वास महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केला आहे. येत्या काळात भारतीय संघाचे न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध एकूण १३ कसोटी सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघ उल्लेखनीय कामगिरी करून कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठेल, असे धोनीने म्हटले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. गेल्या वर्षभरात भारतीय कसोटी संघाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, विराटच्या नेतृत्त्वात संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळेल, असेही तो पुढे म्हणाला.

भारतीय संघाला आता उत्तम आकार मिळाला आहे. केवळ ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ पक्का झाल्याचे आपण समजत होतो, पण आता खेळाडूंच्या गाठीशी उत्तम अनुभव देखील आहे. आपण गेल्या दोन वर्षांपासूनच्या संघावर एक नजर टाकली, तर आपल्या लक्षात येईल की फलंदाजी क्रमवारीत आपल्याला खूप मोठे बदल करावे असे वाटत नाही. संघ पूर्णपणे पक्का झाला असून, प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. आपल्याकडे आता एकूण १० वेगवान गोलंदाज देखील आहेत. त्यांचा आपल्याला सामन्याच्या उपयुक्ततेनुसार वापर करता येईल, असेही धोनी पुढे म्हणाला.

वाचा: अमेरिकेत अधिक क्रिकेट खेळवायला हवे – धोनी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात गोलंदाजांनी निराशा केली असली तरी दुसऱया सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले होते. दुसऱया सामन्यात खेळपट्टीमध्ये बदल झाला असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे दुसऱया सामन्यात आपल्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, असे म्हणत धोनीने भारतीय गोलंदाजांची पाठराखण केली.