भारतीय संघाचा धडाकेबाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ‘लाला’ या टोपणनावाचा खुलासा केला आहे. नुकताच वीरूने आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवशी सेहवागने त्याला लाला हे टोपणनाव कसे मिळाले याबाबत माहिती दिली. सेहवागला त्याच्या वाढदिवशी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंसोबतच बॉलीवूडक कलाकारांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. वीरूने या सर्वांचे आभार देखील व्यक्त केले. शुभेच्छा देणाऱयांच्या यादीत भारताचा माजी क्रिकेटवीर आणि सेहवागचा सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकरने केलेले ट्विट वीरुसाठी खास होते. क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विनाश करणारा सर्वात चांगला व्यक्ती आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा लाला!, असे ट्विट सचिनने केले होते.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये वीरूचा पुन्हा एकदा ‘लाला’ असा उल्लेख केल्यानंतर ट्विटरकांनी वीरूकडे प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. सर्वांना वीरूच्या ‘लाला’ या टोपणनावामागील रहस्य जाणून घ्यायचे होते. आपल्या टोपणनावाबाबत खुलासा करताना वीरू म्हणाला की, मी खेळपट्टीवर असताना सर्व गोष्टी एखाद्या वाण्याप्रमाणे (दुकानदार) लक्षात ठेवत असे. मी दिसायला सुद्धा एका वाण्यासारखा म्हणजेच लालासारखा होतो. फलंदाजीवेळी मी किती चौकार मारले, किती चेंडू खेळलो किंवा किती सिंगल्स आणि डबल्स धावा केल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती माझ्याजवळ असे. कदाचित याच सवयीमुळे सचिन मला लाला संबोधित असल्याचे सेहगवाने सांगितले. सचिनने दिलेल्या शुभेच्छांचेही वीरुने आभार व्यक्त केले.