भारतीय ‘अ’ संघाच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी लालचंद राजपूत यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दौऱ्याचा प्रारंभ तिरंगी मालिकेने होणार असून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघाबरोबर दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. बऱ्याच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारे राजपूत या दौऱ्याबद्दल आशावादी आहेत. आम्ही दर्जेदार कामगिरीच्या जोरावर यश संपादन करू. या दौऱ्याचा भारतीय संघाला आगामी दौऱ्यासाठी नक्कीच फायदा होणार असल्याचे राजपूत सांगतात. भारताच्या ट्वेन्टी-२० संघाने २००७मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाचे प्रशिक्षकपद भूषवलेल्या राजपूत यांना आता भारतीय संघाचे प्रशिक्षकपद खुणावत असून त्यांनी हेच स्वप्न उराशी बाळगलेले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी तुम्ही काय सांगाल?
दक्षिण आफ्रिकेचा दौरा नेहमीच कठीण ठरलेला आहे. वेगवान खेळपट्टय़ा आणि वातावरण यांचे आव्हानही खेळाडूंपुढे असते. पण यापूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या वेळी मी येथे होतो, त्यामुळे इथल्या वातावरणाचा आणि खेळपट्टय़ांचा मला चांगलाच अंदाज आहे, त्याचा नक्कीच संघाला फायदा होईल. आम्ही दौऱ्याच्या सुरुवातीला तिरंगी मालिका खेळणार असून, यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाचा समावेश आहे. त्यानंतर आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघाबरोबर कसोटी सामने खेळणार आहोत.
संघातील खेळाडूंबद्दल तुम्ही काय सांगाल?
दौऱ्यासाठी निवड झालेल्या १६ खेळाडूंपैकी १० खेळाडू झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर होते, तर सहा खेळाडू माझ्यासह बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. संघात शामी अहमद, ईश्वर पांडे, मोहित शर्मा, शाबाद नदीमसारखे गुणवान गोलंदाज आहेत, तर चेतेश्वर पुजारासारखा खंबीर कर्णधार आहे. स्टुअर्ट बिन्नीसारखा अष्टपैलू खेळाडूही संघात आहे. या संघातील काही खेळाडू भारतीय संघात असल्याने त्यांना या अनुभवाचा आगामी भारतीय दौऱ्यात चांगलाच फायदा होईल.
चेतेश्वर पुजाराच्या कर्णधारपदाबद्दल काय सांगाल?
चेतेश्वर पुजाराकडे खंबीर नेतृत्व आहे. वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, तेव्हा त्याची कामगिरी मला जवळून पाहता आली. संघाला एकत्र ठेवून यशापर्यंत घेऊन जाण्याचे कसब त्याच्याकडे आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. एक चाणाक्ष कर्णधाराबरोबरच तो एक गुणवान फलंदाजही आहे.
संघाची तयारी कशी चालू आहे?
संघातील १० खेळाडू झिम्बाब्वेला असल्याने त्यांचा सराव सुरूच आहे. मी सध्या भारतात असलेल्या खेळाडूंचा सराव पाहतो आहे. त्यांची कामगिरी अधिकाधिक चांगली व्हावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करत आहे.
तुम्ही बऱ्याचदा १९-वर्षांखालील भारतीय संघाचे, भारतीय ‘अ’ संघाचे आणि ट्वेन्टी-२० विश्वविजयी संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, तुम्हाला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद खुणावते आहे का?
नक्कीच, कारण भारतातील बहुतांशी युवा खेळाडूंना मी मार्गदर्शन केले आहे, त्यांचा खेळ पाहिला आहे. कोणत्या खेळाडूमध्ये काय गुणवत्ता आहे आणि ती कधी व कशी वापरायची, हे मला चांगलेच माहिती आहे. आतापर्यंतच्या बऱ्याच स्पर्धामध्ये माझ्या प्रशिक्षकपदाखाली भारताने विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे आता भारताचे प्रशिक्षक भूषवण्याचे माझे स्वप्न आहे. मला जर संधी मिळाली तर नक्कीच अथक मेहनत घेत या पदाला न्याय देण्याचा आणि भारताचे नाव उंचावण्याचा
प्रयत्न करेन.