IND vs ENG : चेपॉकच्या मैदानावर अश्विन यानं बळींची पंचमी साजरी केली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभारणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांत गारद झाला. फिरकीला पूर्णत: साथ देणाऱ्या चेपॉकच्या खळपट्टीनं दुसऱ्या दिवशी १५ फलंदाजांना बाद करत आपले रंग दाखले. ३४ वर्षीय अश्विन यानं कसोटी कारकीद्रीत २९ व्यांदा आणि मालिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. अश्विन यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अश्विननं हरभजन सिंगची माफी मागिताना आदर व्यक्त केला आहे.

दुसऱ्या दिवशी अश्विन (२६६ बळी) यानं भारतामध्ये कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. अश्विन यानं महान फिरकीपटू हरभजन सिंह (२६५ बळी) याला मागे टाकलं आहे. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. कुंबळेच्या नावावर ३५० बळींची नोंद आहे. सामन्यानंतर या विक्रमाबाबत पत्रकारांनी विचारलं असता अश्विन म्हणाला की, ” मी 2001 च्या मालिकेत ‘भज्जी पाजी’ ला खेळताना पाहिलं होतं. तेंव्हा मी राज्य स्तरावर एक फलंदाज म्हणून खेळत होतो. त्यावेळी मी ऑफ स्पिनर म्हणून देशासाठी खेळेल असं कधीच वाटलं नव्हतं. हरभजनचा रेकॉर्ड मोडल्याचं मला माहिती नव्हतं, असंही त्याने सांगितले.

आणखी वाचा- चेन्नईच्या खेळपट्टीवरून शेन वॉर्न-मायकल वॉनमध्ये ‘ट्विटरवॉर’

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, ‘क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर मी हरभजनसारखी गोलंदाजी करत होतो. त्यामुळे मित्र माझी थट्टा उडवत होते. त्यादिवसानंतर आज मी हरभजनचा रेकॉर्ड मोडला आहे. हे खरंच अविश्सनीय आहे. मला याबद्दल माहिती नव्हतं. आता मला याची माहिती झाल्यावर आनंद होत आहे, भज्जी पाजी मला माफ कर…’