शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघातील खेळाडूंमध्ये रंगणारं द्वंद्व आता प्रत्येकाला परिचीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर आफ्रिदी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेकदा काश्मीर आणि भारत सरकारविरोधी वक्तव्यामुळे आफ्रिदीला भारतीय नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला करोनाची लागण झाली होती, यामधून सावरत असताना त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाची खोडी काढली आहे. CricCast या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शाहिद आफ्रिदीने, “पाकिस्तानी संघाने भारताला अनेकदा हरवलंय. आम्ही भारतीय संघाला अशा पद्धतीने हरवायचो की सामना संपल्यानंतर आम्हालाच जरा वाईट वाटायचं आणि आम्ही त्यांची माफी मागायचो”, असं वक्तव्य केलं आहे.

१९९९ मध्ये भारताविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात केलेली १४१ धावांची खेळी ही आपल्यासाठी संस्मरणीय खेळी ठरल्याचं आफ्रिदीने सांगितलं. या सामन्यातत पाकिस्तानने भारतावर १२ धावांनी मात केली होती. भारताविरुद्ध खेळताना कधी दडपण यायचं का असं विचारलं असताना आफ्रिदी म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं असतं. प्रत्येक सामन्याच चाहत्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात, प्रत्येक सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी करावी अशी त्यांची अपेक्षा असते. भारताविरुद्ध खेळायला मला नेहमी आवडतं. आम्ही अनेकदा भारतीय संघाला हरवलं आहे, आम्ही त्यांना इतक्या वाईट पद्धतीने हरवायचो की नंतर आम्हालाच वाईट वाटायचं आणि सामना संपल्यानंतर आम्ही त्यांची माफी मागायचो.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरोधात खेळताना नेहमी आपला कस लागल्याचं आफ्रिदीने यावेळी मान्य केलं. हे दोन्ही संघ चांगले संघ आहेत आणि त्यांच्याविरोधात त्यांच्याच देशात चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला १०० टक्के तयार असावं लागतं असंही आफ्रिदी म्हणाला. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ल्याचं कारण देत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये. आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांत क्रिकेटचे सामने खेळवण्याची मागणी केली होती, परंतू भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.