|| प्रशांत केणी

अमित बर्मन, अल्टिमेट खो-खो लीगचे प्रवर्तक

मुंबई : अल्टिमेट खो-खो लीगद्वारे संघटनेच्या साहाय्याने खेळाचे व्यावसायिकीकरण करण्याचे उद्दिष्ट आम्ही जोपासले आहे. या देशी क्रीडा प्रकाराला आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अल्टिमेट खो-खो लीगचे प्रवर्तक आणि डाबर इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष अमित बर्मन यांनी सांगितले.

लीगच्या अर्थव्यवस्थेबाबत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हे आदर्श उदाहरण आहे. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य लीगचा आढावा घेतल्यास प्रो कबड्डी लीगचा विकास योग्य पद्धतीने होत आहे. देशी खेळांमध्ये कबड्डीइतकाच खो-खोसुद्धा जनमानसात लोकप्रिय खेळ मानला जातो. गेल्या तीन वर्षांत भारताने अनेक आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धामधील सुवर्णपदक टिकवले आहे. व्यावसायिकीकरणामुळे खो-खो खेळाचे रूप पालटू शकते, असा विश्वास बर्मन यांनी व्यक्त केला. अल्टिमेट लीगच्या आव्हानांबाबत बर्मन यांच्याशी केलेली खास बातचीत-

 खो-खो क्रीडा प्रकाराला मोठा इतिहास गाठीशी आहे, पण तरीसुद्धा हा खेळ देशात अपेक्षित स्थान प्राप्त करू शकलेला नाही. खो-खो लीगमुळे हे वातावरण बदलेल का?

देशातील ७००हून अधिक जिल्ह्य़ांमधील जवळपास १५ लाख खेळाडू खो-खो खेळतात. त्यामुळे हिंदी भाषिक आणि दाक्षिणात्य परिसरात खो-खो लीगसाठी दर्शक मिळतील आणि छोटय़ा शहरांत आणि युवकांमध्ये हा खेळ रुजेल, अशी आशा आहे. किंबहुना टीव्हीवर सादर करताना त्यात तसेच आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. हवेतली उडी, पोलपाशी झेप, पळती, हुलकावणी ही वैशिष्टय़े सर्व वयोगटांच्या चाहत्यांना आवडतील.

 अल्टिमेट खो-खो लीगमुळे अज्ञात खो-खोपटूंना ओळख मिळेल का?

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पाच वर्षांत २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम खेळाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी वापरली जाणार आहे. नुकतेच आम्ही १३० खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले. ज्याचा खेळाडूंना अतिशय फायदा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोपटूंना मानाचे उत्पन्न मिळेल आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, हेच आमचे लक्ष्य आहे.

‘आयपीएल’ आणि प्रो कबड्डीशी चित्रपट क्षेत्रातील अनेक मंडळी नातेसंबंध आहेत. ग्लॅमरचा लीगच्या यशासाठी उपयोग होतो का?

चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेकांनी अल्टिमेट खो-खो लीगबाबत उत्सुकता दर्शवली आहे. संघखरेदीसाठी काही तारांकित व्यक्तींशी चर्चासुद्धा सुरू आहेत. खेळाला फायदेशीर ठरतील आणि पुढे घेऊन जाऊ शकतील, अशा व्यक्तींना आम्ही प्राधान्य देऊ.

अनेक क्रीडा प्रकार आणि लीग उपलब्ध असतानाही तुम्ही खो-खो खेळाचीच निवड का केली?

प्रत्येक भारतीय आयुष्यात एकदा तरी खो-खो खेळला आहे. क्रिकेटशिवाय अन्य क्रीडा प्रकारांमध्येही भारत यश मिळवत आहे. याची राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्येही प्रचीती येते. ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम युवा पिढीसाठी व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळेच खो-खो या खेळाची निवड केली. वेग, हालचाली आणि उत्कंठा या गुणवैशिष्टय़ांमुळे टीव्हीवरील क्रीडा प्रकार म्हणून या खेळाचे रूपांतरण करता येऊ शकते, याची खात्री होती.

तांत्रिकदृष्टय़ा खेळ सादरीकरण आणि सांख्यिकी यांचा अल्टिमेट खो-खो लीगने कशा प्रकारे विचार केला आहे?

‘फक्त पळण्यापेक्षा पाठलाग करून पकडा’ हेच अल्टिमेट खो-खो लीगचे वैशिष्टय़ आहे. भारतीय खो-खो महासंघाच्या मदतीने इंग्लिश, हिंदी आणि स्थानिक भाषांमधील समालोचक विकसित करीत आहोत. कारण या वेगवान क्रीडा प्रकाराला चित्रबद्ध करतानाच शब्दांचेही महत्त्व आहे. जुन्या धाटणीच्या या पारंपरिक क्रीडा प्रकारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादरीकरण कसे करता येईल, याचे प्रयोग सुरू आहेत. यात सांख्यिकी हा भागसुद्धा अविभाज्य आहे.