Premium

Cricket World Cup: जेव्हा लिटील मास्टर सुनील गावसकरांची वर्ल्डकपमधली खेळी ठरली होती टीकेचं लक्ष्य

Cricket World Cup: क्रिकेट वर्ल्डकप सुरू व्हायला आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. १९७५ मध्ये मात्र विश्वचषकाची सुरुवात मात्र एका वेगळ्या कारणाने गाजली होती.

Sunil Gavaskar world cup innings
सुनील गावस्करांची वर्ल्डकपमधली खेळी (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

हेल्मेट आणि अन्य साधनांची साथ नसताना, आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या लिटील मास्टर सुनील गावसकर यांचं नाव क्रिकेटविश्वात आदराने घेतलं जातं. मुंबईच्या क्रिकेटच्या नर्सरीत घडलेल्या सुनील यांनी दिग्गज गोलंदाजांविरुद्ध तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ सादर केला. विदेशात भारताला जिंकून देण्याचा आत्मविश्वास सुनील यांच्या बॅटने दिला. कसोटी प्रकारात १०,००० धावा आणि ३४ शतकं नावावर असणाऱ्या सुनील यांची सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये गणना होते. फलंदाजी करणाऱ्या प्रत्येकासाठी आदरणीय अशा लिटील मास्टर यांना वर्ल्डकपमधल्या कूर्म गतीच्या खेळीसाठी टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७५ मध्ये पहिलावहिला वर्ल्डकप इंग्लंडमध्ये ७ जून रोजी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स इथे आयोजित करण्यात आला होता. सुनील गावस्कर यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुमदुमत होती. वर्ल्डकपचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि भारतीय संघात झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३३४ धावांचा डोंगर उभारला होता. डेनिस अमिस यांनी १३७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. किथ फ्लेचर यांनी ६८ तर ख्रिस ओल्ड यांनी ५१ धावांची खेळी केली. कर्णधार माईक डेनेस यांनी ३७ धावांची उपयुक्त खेळी केली होती.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने तीन विकेट्सच्या मोबदल्यात १२३ धावांची मजल मारली. भारताच्या डावाचं वैशिष्ट्य म्हणजे सुनील गावस्कर यांची संथ खेळी. गावस्कर यांनी १७४ चेंडू खेळून काढत फक्त ३६ धावा केल्या. या कूर्म गती खेळीत अवघा एक चौकार होता. गावस्कर यांनी पूर्ण ६० षटकं खेळपट्टीवर तळ ठोकला पण त्यांचा स्ट्राईकरेट म्हणजे धावांची गती (२०.६८) चक्रावून टाकणारी होती. काही तासांपूर्वी इंग्लंडने साडेतीन चार तासात तीनशेची वेस ओलांडली होती. भारताने रडतखडत शंभरीचा टप्पा ओलांडला. लक्ष्य डोंगराएवढं होतं हे खरं पण गावस्करांकडून दमदार खेळीची चाहत्यांना अपेक्षा होती. गावस्करांची बॅट जणू म्यानच झाली. कसोटी क्रिकेटमध्ये सामना अनिर्णित करण्यासाठी खेळी करतात तशी त्यांनी खेळी साकारली.

आजच्या काळात जेव्हा ३०-४० चेंडूत शतक झळकावलं जात असताना इतकी संथ खेळी कोणी साकारू शकतं यावर चाहत्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही. गावसकरकरांच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने प्रेक्षकांनी हुर्यो उडवल्याचंही संघातील सहकाऱ्यांनी नंतर सांगितलं. धावा करण्यासंदर्भात गावस्कर यांना संदेशही दिल्याचं त्यांनी सांगितलं.

संथ खेळूया असं संघाच्या बैठकीत ठरलं नसल्याचं कर्णधार वेंकटराघवन यांनी सांगितलं. गावसकर यांनी ‘सनी डेज’ या आत्मचरित्रात या खेळीबाबत खुलासा केला. ते लिहितात, ‘ती खेळी म्हणजे दुखरी नस आहे. स्टंप्सपासून बाजूला जावं जेणेकरून मी आऊट होईन असं वाटलं होतं’, असं गावसकर यांनी लिहिलं आहे.

संघव्यवस्थापनाला गावसकर यांच्या ताकदीची कल्पना होती. वर्ल्डकपच्या भारताच्या पुढच्या म्हणजेच ईस्ट आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत गावसकरच सलामीला उतरले. गावसकर यांनी लौकिलाला जागत ८६ चेंड़ूत ९ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. त्यांची बॅट एका सामन्यापुरतीच रुसली होती हे चाहत्यांना लगेचच कळलं.

गावसकर यांनी १९७५, १९७९, १९८३, १९८७ अशा चार वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना १९ सामन्यात ५६१ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. १९८७च्या वर्ल्डकप स्पर्धेत गावसकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध नागपूर इथे शतकी खेळी साकारली होती.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When sunil gaaskars slow innings in world cup opner match in 1975 was criticized psp

First published on: 25-09-2023 at 13:12 IST
Next Story
IND vs AUS: डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला राईट हॅण्ड बॅटिंग करणं पडलं महागात, अश्विनने दिला धोबीपछाड; पाहा Video