महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाकडून चांगल्या खेळीची आणि विश्वचषक जिंकण्याची आशा होती. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील निराशाजनक कामगिरीचा भारतीय महिला क्रिकेट संघाला फटका बसला. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मराठमोठ्या स्मृती मानधनाने दिमाखदार फलंदाजी करत ८४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिताली राजनेही चांगला खेळ करत ८४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या जोरावर ६८ धावा केल्या. परंतु तरीही संघाला पराभव पत्करावा लागला.

‘त्या’ नो बॉलने केला घात, भारताचा पराभव, टीम इंडिया महिला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

दरम्यान, ही विश्वचषक स्पर्धा कर्णधार मिताली राजची शेवटची स्पर्धा असू शकते, अशा चर्चा सुरू होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मितालीला विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर ती निवृत्त होणार आहे का?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मिताली म्हणाली की, “मी भविष्याबद्दल फारसं नियोजन केलेलं नाही. एखाद्या स्पर्धेसाठी खेळाडूंनी वर्षभर खूप मेहनत घेतली असेल आणि जेव्हा विश्वचषकातून आम्ही अशाप्रकारे बाहेर पडतो, ही बाब खूप निराशाजनक असते. त्यामुळे ही हार स्वीकारायला आणि पचवायला आम्हाला वेळ लागतो. परंतु खेळाडूंनी ही हार स्वीकारावी आणि नंतर प्रत्येक खेळाडूसाठी पुढच्या ज्या स्पर्धा असतील, त्याची तयारी करावी,” असं उत्तर तिने दिलं. मात्र, स्वतःच्या निवृत्तीच्या चर्चांबद्दल तिने स्पष्टता केली नाही.

‘तुला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहण्याची ही शेवटची वेळ आहे का,’ असं विचारलं असता ती म्हणाली “आम्ही ज्या प्रकारे खेळलो, त्यावरून आधी म्हटल्याप्रमाणे मी यावर काहीही भाष्य करणे माझ्यासाठी योग्य होणार नाही. त्यामुळे मी त्याबद्दल काही स्पष्ट बोलण्यापूर्वी आम्ही ही हार स्वीकारून ती पचवणं आवश्यक आहे,” असं तिने सांगितलं.