बांधकाम कामगाराच्या आकस्मिक निधनप्रकरणी ब्राझील सरकारने साओ पाओलो स्टेडियमच्या दोन तात्पुरत्या स्टॅण्ड्सच्या उभारणीचे काम थांबवले आहे. विश्वचषकाची सलामीची लढत होणाऱ्या कॉरिनथिअन्स क्लब स्टेडियमच्या निर्माणाची पाहणी मंगळवारी करण्यात येणार आहे. यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात १२ जूनला विश्वचषकाची सलामीची लढत होणार आहे. शनिवारी झालेल्या दुर्दैवी घटनेत साओ पाओलो स्टेडियमच्या उभारणीदरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. २६ फुटांवरून खाली पडल्याने त्याचे निधन झाले. हे स्टेडियम बांधत असताना तीन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर विश्वचषकाच्या स्टेडियम्सचे काम सुरू असताना सात कामगारांचे निधन झाले आहे. दरम्यान, शनिवारी निधन झालेल्या कामगाराने सुरक्षा उपकरणे परिधान केल्याचे वृत्त आहे, मात्र हा कामगार ज्या कंपनीत काम करीत होता, त्या कंपनीने याचा इन्कार केला आहे. क्षेत्रीय कामगार विभागाने साओ पौलो स्टेडियममधील दोन तात्पुरत्या स्तंभांचे बांधकाम स्थगित केले आहे. जोपर्यंत कामगारांसाठी सुरक्षा जाळीची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत काम ‘जैसे थे’ राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले. या दोन स्टॅण्ड्सची प्रेक्षक क्षमता २०,००० असून याची उभारणी निर्धारित वेळेत व्हावी यासाठी संयोजक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
 या स्टेडियमच्या निर्माणाची जबाबदारी असणाऱ्या फास्ट इन्जेनहारिआ कंपनीने अपघातानंतर तांत्रिक परीक्षण हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, साओ पाओलो  स्टेडियमच्या निर्माणादरम्यान झालेल्या दुसऱ्या अपघातामुळे फिफाने या स्टेडियमच्या पूर्ततेची वेळ वाढवून दिली आहे. एप्रिल मध्यापर्यंत संयोजकांना उभारणीचे काम पूर्ण करायचे आहे. मात्र काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याची कबुली संयोजकांनी दिली आहे. मात्र विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीपर्यंत स्टेडियम तयार असेल असा विश्वास फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी व्यक्त केला. विश्वचषकासाठी फुटबॉल स्टेडियममध्ये बांधण्यात येत असलेल्या तात्पुरत्या स्टॅण्ड्सच्या उभारणीसाठीचे २६ दशलक्ष डॉलर्स कोण देणार, असा सवाल ब्राझीलमध्ये उपस्थित केला जात आहे.