अखेरच्या चार लढतींमध्ये दोन विजयांची आवश्यकता असताना नवव्या फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे विश्वनाथन आनंदचे विश्वविजेतेपद जवळपास धोक्यात आले आहे. विश्व अजिंक्यपद बुद्धिबळाच्या लढतीत आनंदविरुद्ध आतापर्यंत तीन लढती जिंकून बाकीच्या लढती बरोबरीत सोडवणारा आव्हानवीर मॅग्नस कार्लसन विश्वविजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करण्यासाठी कार्लसनला अवघ्या अध्र्या गुणाची आवश्यकता आहे. कार्लसनचा सध्याचा फॉर्म आणि आनंदचा होणारा सुमार खेळ पाहता, शुक्रवारी होणाऱ्या १०व्या लढतीतच कार्लसन विश्वविजेतेपदाचा मानकरी होईल, अशी दाट शक्यता आहे.
‘करो या मरो’ अशा स्थितीत पांढऱ्या मोहऱ्यांसह नवव्या फेरीत खेळणाऱ्या आनंदने झकास सुरुवात केली होती. १४व्या चालीपर्यंत तो मजबूत स्थितीत होता. पण त्यानंतर त्याने केलेल्या घोडचुका त्याला भोवत गेल्या. २८व्या चालीनंतर आपण पराभूत होणार, हे दिसू लागल्यानंतर आनंदने माघार घेतली.
पाचवा आणि सहावा डाव जिंकून २२ वर्षीय कार्लसनने आनंदला खडबडून जागे व्हायला भाग पाडले होते. त्यानंतर सातवा आणि आठवा डाव बरोबरीत सोडवून आनंद ३-५ अशा दोन गुणांच्या पिछाडीवर पडला होता. त्यामुळे नववा डाव जिंकणे त्याला क्रमप्राप्त होते. पण आनंदला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याला विश्वविजेतेपद गमवावे लागणार आहे.
नवव्या डावात काळ्या मोहऱ्या असूनही लागोपाठ दोन डाव जिंकल्यामुळे कार्लसन आत्मविश्वासाने खेळत होता. आता पुढील तीन डावांत अध्र्या गुणाची आवश्यकता असलेला कार्लसन बुद्धिबळातील नवा सम्राट होण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. १०व्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी असल्यामुळे कार्लसन शुक्रवारीच जगज्जेतेपदावर मोहोर उमटवणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

उत्साहाच्या भरात माझ्या हातून घोडचुका होत आहेत, हे सुरुवातीला लक्षात आले नाही. मी उत्स्फूर्तपणे घोडय़ाच्या चाली करत गेलो. पण ज्यावेळी माझ्या चुका लक्षात आल्या, त्यावेळी डावातून माघार घेण्यावाचून माझ्यासमोर पर्याय शिल्लक राहिला नव्हता. यापुढे सलग तीन सामने जिंकण्याच्या प्रयत्नांत मी होतो. पण परिस्थिती माझ्या विरुद्ध होत गेली.       – विश्वनाथन आनंद

सुरुवातीपासून परिस्थिती फारच किचकट होत चालली होती. त्या वेळी मला कोणत्या चाली करायच्या आहेत, हे सुचत नव्हते. पण आनंदने केलेल्या घोडचुकांचा मी फायदा उठवला. हा डाव फारच अटीतटीचा झाला. आनंद माझ्यावरच मात करणार, अशा स्थितीत असताना बचावात्मक खेळाने मला तारले. मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. – मॅग्नस कार्लसन