प्रेक्षकांविना फुटबॉलला काहीच किंमत नाही, असे मत फिफाचे अध्यक्ष गिअ‍ॅनी इन्फॅन्टीन्हो यांनी व्यक्त केले आहे. फिफा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचे इन्फॅन्टीन्हो यांचे हे पहिले वाक्य. फुटबॉल हा एका इमारतीप्रमाणे आहे आणि प्रेक्षक हे त्या इमारतीचा पाया आहेत. त्यामुळे भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी प्रत्येक क्रीडारसिकाला फुटबॉलच्या प्रेमात पाडायलाच हवे. भारतीय फुटबॉल संघाच्या सामन्यांचे प्रक्षेपण गेली अनेक वर्षे झालेच नव्हते आणि त्यामुळे तसा प्रेक्षकवर्ग बनवण्यात हा खेळ अपयशी ठरला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेतील सामना पुढे ढकलावा लागला. अशी नामुष्की पुन्हा स्वीकारायची नसेल आणि फुटबॉल क्रांती घडवायची असेल, तर ही विश्वचषक स्पर्धा योग्य संधी आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची पहिलीच स्पर्धा भारतात होत आहे. १५ दिवसांवर फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येऊन ठेपली आहे, परंतु या स्पर्धेची वातावरणनिर्मिती झालेली अजूनही पाहायला मिळत नाही. नवी मुंबईसह कोची, गोवा, नवी दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी या सहा शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने आयोजित केले जाणार आहेत आणि या शहरांपुरताच स्पर्धेचा ज्वर चढत आहे. उर्वरित शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये ही स्पर्धा, हा खेळ कुठेच सापडत नाही. पूर्वाचलातील सर्वाधिक खेळाडू भारतीय संघात आहेत आणि तेथील एकूण लोकसंख्येचा अभ्यास करता, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेवढी प्रेक्षकसंख्या पुरेशी नाही. फुटबॉल हा खेळ भारतीयांना नवीन नसला तरी त्याची जागतिक स्पर्धा येथील क्रीडाप्रेमींच्या पचनी पाडणे थोडेसे अवघड आहे. त्यात स्पर्धेदरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया आणि भारत-न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट मालिकेतील सामने, प्रो कबड्डी लीग आहेतच. त्यामुळे या क्रिकेट आणि कबड्डीची प्रसिद्धी पाहता फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला त्या शर्यतीत उभे राहण्याचे आव्हान समर्थपणे पेलावे लागणार आहे.

कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चाहत्यांचा मोठा वाटा असतो. एखाद्या संघाला जेवढे भरभरून प्रेम चाहत्यांकडून मिळेल, तेवढय़ा त्या स्पर्धेच्या यशाचा आलेख चढाच राहणार; पण या यशाअपयशामागे व्यावसायिक गणितही असते. जेतेपद पटकावणे हे लक्ष्य असले, तरी त्या यशाच्या आलेखाची उंची वाढवत राहणे हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. फुटबॉल संघात बऱ्याच प्रायोजकांची गुंतवणूक असते आणि खेळाच्या विकासाचा हा प्रमुख स्रोत आहे. या स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर प्रायोजकाचा आकडा कमीअधिक होत असतो. उदाहरणार्थ इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबला जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्यामुळेच आदिदाससारख्या कंपनीकडून त्यांना वर्षांला जवळपास ७.५ कोटी अमेरिकन डॉलर इतकी रक्कम दिली जाते. तसेच भारतात क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीही कोटय़वधीची बोली लावली जाते, कारण या खेळाचा आणि खेळाडूचा वैयक्तिक प्रेक्षकवर्ग. त्यामुळे क्रिकेट सामन्यादरम्यान सर्व उत्पादने खपवली जातात. भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटीच्या घरात आहे आणि त्यातील क्रिकेट पाहणाऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये पैशांचा पूर हा येतच राहतो. स्थानिक सामन्यांपासून ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो पाहायला मिळतो.

भारत केवळ पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे आयोजन करत नाही, तर फिफाच्या स्पर्धेत खेळण्याचीही आपली ही पहिलीच संधी आहे. त्यामुळे देशातील सर्वाचे लक्ष या स्पर्धेकडे नक्की लागले असेल; अगदी प्रायोजकांचेही. या स्पर्धेत भारत काही चमत्कारिक कामगिरी करेल, अशी भाबडी आशा बागळणे मूर्खपणाचे ठरेल. अमेरिका, घाना आणि कोलंबिया यांच्या फुटबॉल संघाच्या तुलनेत आपण बरेच पिछाडीवर आहोत; पण या स्पर्धेतील भारताच्या सामन्यांना होणारी गर्दी या खेळाचे भविष्य ठरवणारी ठरेल. आता भारतातील अनेक पालकांची मानसिकता बदलली आहे. आपल्या मुलाने क्रिकेटऐवजी इतर खेळांत सहभाग घ्यावा असे वाटू लागले आहे. मात्र इतर खेळांचा पायाभूत विकास पाहता, तो पर्याय त्यांना मिळत नव्हता. इंडियन सुपर लीगमुळे आणि आता विश्वचषक स्पर्धेमुळे फुटबॉलच्या रूपाने तो पर्याय मिळत आहे. युवा वर्गात फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ९० टक्के हे युवक असतील, यात शंका नाही. हेच या स्पर्धेचे यश असेल. अधिकाधिक युवकांना आकर्षित करून देशातील फुटबॉलचा पाया मजबूत करण्याचे काम ही स्पर्धा करणार आहे. हेच लक्षात ठेवून केंद्र सरकार आणि एआयएफएफ यांनी विविध उपक्रम राबवत फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न केले आहेत. थेट प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या सोनी वाहिनीवरही या स्पर्धेच्या गाण्याचे वारंवार प्रक्षेपण केले जात आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारच्या अनेक अधिकृत संकेतस्थळांवरूनही स्पर्धेबाबतची जनजागृती केली जात आहे.

स्वदेश घाणेकर swadesh.ghanekar@expressindia.com