तुषार वैती

करोनाने जगभर हाहाकार माजवला असताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वी हॉकीतील दोन ताऱ्यांचा एकाच दिवशी झालेला मृत्यू क्रीडा क्षेत्राला चटका लावून गेला. यापैकी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये देशाला हॉकीतील अखेरचे सुवर्णपदक मिळवून देणारे सुवर्णवीर महाराज किशन कौशिक म्हणजेच एम. के. कौशिक यांच्या निधनाने भारतीय हॉकीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

चतुरस्र हॉकीपटू, यशस्वी प्रशिक्षक, प्रशासक, लेखक आणि ‘चक दे इंडिया’ चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कौशिक यांनी आपल्या सकारात्मक ऊर्जेने भारतीय संघात आमूलाग्र बदल घडवले. महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या कामगिरीने प्रेरित झालेल्या कौशिक यांनी त्यांच्या खेळात अचूकता आणण्यासाठी ‘फक्त आणि फक्त सराव करा’ हा मूलमंत्र आयुष्यभर जोपासला.

दिल्लीच्या पहाडगंज येथे जन्मलेल्या कौशिक यांना शाळेत असतानाच हॉकीचा लळा लागला. किरोरी माल महाविद्यालयात शिकताना त्यांनी हॉकीच्या सरावात वाहून घेतले. दिल्ली विद्यापीठाकडून खेळताना कौशिक यांना सरकारी नोकरीचे अनेक प्रस्ताव आले. ७०च्या दशकात कौशिक हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. दिल्ली विद्युत मंडळानंतर टाटाकडून एक वर्ष खेळल्यावर कौशिक यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली. राष्ट्रीय स्तरावर १९७५ ते १९८६ दरम्यान मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करताना कौशिक यांनी अनेक जेतेपदे आणि पदके मिळवून दिली. त्यामुळेच कौशिक यांना महाराष्ट्र शासनाने १९८१मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले.

१९७५मध्ये भारताच्या सराव शिबिरात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंकडून खेळातील बारकावे शिकत कौशिक यांच्या तंत्रात कमालीची सुधारणा झाली. १९७६ मध्ये लाहोरच्या कैद-ए-आझम हॉकी स्पर्धेत त्यांनी पदार्पण के ले. अस्लम शेर खान यांच्या नेतृत्वाखाली कौशिक यांची कामगिरी प्रशंसनीय झाली. १९७५मध्ये विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ काहीसा अतिआत्मविश्वासात होता. १९७६च्या ऑलिम्पिक सराव शिबिरात त्याचा अनेकदा प्रत्यय आला. परिणामी भारताला माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा आघात सर्व खेळाडूंवर झाला. पुढील ऑलिम्पिकमध्ये जेतेपदाची कसर भरून काढायची, हा चंग सर्वानी बांधला. १९७९ मध्ये युरोपातील संघांविरुद्ध तसेच पाकिस्तानविरुद्धच्या हॉकी मालिकेत प्रतिस्पर्धी खेळाडू व्हिडीयो चित्रणाद्वारे भारतीय खेळाडूंच्या क्षमता आणि कच्च्या दुव्यांचा अभ्यास करत आहे, ही गोष्ट कौशिक यांच्या लक्षात आली. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या खेळात आणि रणनीतीत अनेक बदल केले.

अनेक देशांनी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला तरी भारतीय संघ पूर्ण जिद्दीने उतरला. पहिल्या सामन्यात टांझानियाला १८-० असे हरवल्यानंतर भारताने पोलंड आणि स्पेनविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. त्यानंतर क्युबाचा १३-० असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत सोव्हिएत रशियाला २-० असे हरवल्यानंतर भारतासमोर अंतिम फेरीत स्पेनचे आव्हान होते. स्पेनविरुद्ध कौशिक यांनी तिसरा गोल करत आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. हा सामना भारताने ४-३ असा जिंकला. मग २९ जानेवारी १९८२ रोजी विवाहबंधनात अडकल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते हॉकीच्या प्रेमापायी राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोलकाताला रवाना झाले. त्याच वर्षी आशिया चषकात रौप्यपदक मिळवल्यानंतर कौशिक यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. मात्र १९८७पर्यंत ते टाटा संघाकडून खेळले. याच वर्षी पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेचा प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी टाटा संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यानंतर ऑलिम्पिकपटू एम. पी. गणेश यांनी न विचारताच कौशिक यांची भारतीय पुरुष संघाच्या सहप्रशिक्षकपदी नियुक्ती केली. विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर गणेश यांची हकालपट्टी झाल्यानंतर प्रशिक्षकपदाची सूत्रे कौशिक यांच्याकडे आली. भारताला इंदिरा चषक जिंकून दिल्यानंतर कौशिक यांनी महिला संघाची धुरा आपल्याकडे घेतली. त्या काळी महिला हॉकीपटूंना स्टिक पकडता येत नाही, अशी टीका होत असताना कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३च्या आशिया चषकात भारताने कांस्यपदक मिळवले. १९९८मध्ये पुन्हा पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवताना त्यांच्यासमोर राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची अट घातली.

सहा महिन्यांत भारतीय हॉकीपटूंकडून मेहनत करवून घेत कौशिक यांनी ३२ वर्षांनंतर भारताला बँकॉक येथील आशियाई सुवर्णपदक जिंकून दिले; पण भारतीय हॉकी संघटनेच्या गलथान कारभारामुळे आठ खेळाडूंसह कौशिक यांची गच्छंती झाली. परिणामी भारताला २०००च्या ऑलिम्पिकमध्ये पदकापासून दूर राहावे लागले. २००३ ते २००६ या कालावधीत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने अनेक पदके जिंकली. १९९८ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने, तर २००२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामात स्वत:ला वाहून घेतले. अशा या बहुआयामी व्यक्तीच्या निधनाने भारतीय हॉकीची अपरिमित हानी झाली आहे.

tushar.vaity@expressindia.com