पाकिस्तानचा आज बांगलादेश संघाशी सामना

पाकिस्तानचे भारतात येणे हेच नाटय़मयरीत्या लांबले. सुरक्षेची हमी मिळाल्यावर हा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे स्वप्न घेऊन भारतात आला. त्यानंतर कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्यामुळे वाद उद्भवला. आता मात्र त्यांनी पूर्णत: क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले आहे. अव्वल दहामधील दुसऱ्या गटात पाकिस्तानचा संघ बुधवारी आशियाई उपविजेत्या बांगलादेशशी सामना करणार आहे.

काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशकडून पाकिस्तानने पराभव पत्करला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानी संघ उत्सुक आहे. मात्र बांगलादेशचा संघ सध्या उत्तम फॉर्मात आहे, याची झलक आशियाई स्पर्धा आणि विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत क्रिकेट जगताने अनुभवली आहे.

डावखुरा सलामीवीर तमिम इक्बालने ओमानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवला होता. अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने आपल्या डावखुऱ्या फिरकी माऱ्याच्या बळावर २५ धावांत ४ बळी घेतले होते. तसेच ९ चेंडूंत १७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत असल्यामुळे शकिबला ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा पुरेसा अंदाज आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमान दुखापतीतून सावरल्यास बांगलादेशसाठी ते सुचिन्ह ठरेल.

२००९मध्ये ट्वेन्टी-२० जगज्जेतेपद मिळवणाऱ्या पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान मारा आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचे पुनरागमन पाकिस्तानची गोलंदाजीची ताकद वाढवते आहे. मोहम्मद इरफान आणि वहाब रियाझ या आणखी दोन वेगवान गोलंदाजांवर पाकिस्तानची मदार आहे. सराव सामन्यात मोहम्मद हफीझने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. शार्जिल खान, शोएब मलिक, अहमद शेहझाद व उमर अकमलवर पाकिस्तानच्या फलंदाजीची जबाबदारी आहे.

सामना  क्र. फ४

बांगलादेश वि. पाकिस्तान (गट दुसरा)

संघ

बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), अराफत सनी, महमदुल्लाह, सौम्या सरकार, मुशफिकर रहिम (यष्टिरक्षक), सब्बीर रेहमान, अबू हैदर, नुरूल हसन, अल्-अमिन हुसैन, नासिर हुसैन, शकिब अल् हसन, तमिम इक्बाल, तस्किन अहमद, मोहम्मद मिथुन, मुस्ताफिझूर रेहमान.

पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, मोहम्मद इरफान, शार्जिल खान, वहाब रियाझ, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सामी, खलिद लतीफ, मोहम्मद आमिर, उमर अकमल, सर्फराझ अहमद (यष्टिरक्षक), इमाद वसिम, अन्वर अली, खुर्रम मन्झूर.

  • स्थळ : ईडन गार्डन्स, कोलकाता
  • वेळ :  दुपारी ३ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्