६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने शनिवारी रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर शिक्कामोर्तब केले. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत योगेश्वरने पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. योगेश्वर व्यतिरिक्त इतर भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरीचा कित्ता पुन्हा गिरवला. नरसिंग यादवनंतर ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करणारा योगेश्वर भारताचा दुसरा मल्ल आहे.

या स्पध्रेत प्रत्येक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारे दोन्ही कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या योगेश्वरसमोर अंतिम फेरीत प्रवेश करताच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. अंतिम फेरीत त्याने चीनच्या कटाई यीरलॅनबीएकेवर  विजय मिळवला.

पात्रता फेरीत उत्तर कोरियाच्या किम जू-साँगचा ८-१ असा पराभव केल्यानंतर योगेश्वरने उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या झुआन दिंह गुयेनवर १२-२ असे वर्चस्व गाजवले. उपांत्य फेरीत योगेश्वरने ७-२ अशा फरकाने कोरियाच्या ली सेउंग-चूलवर विजय मिळवला.