हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळाबाबत अनेकदा वाद होताना दिसतात. वादांमुळे या खेळावर काहीसा परिणामही होतो. पण, आता हे चित्र बदलताना दिसतंय. म्हणूनच भारतीय हॉकी टीमचे भविष्य उज्ज्वल हाती आहे, असे दिसते.

भारतात हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख असली तरी सातत्याने होत असलेल्या वादामुळे त्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने होताना दिसत आहे. राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेचा वाद असो किंवा विदेशी प्रशिक्षकांना संघटकांकडून मिळत असलेली अपमानास्पद वागणूक. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळत चालली आहे. या मैदानाबाहेरील घडामोडींचा खेळाडूंच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामामुळे भारताला अव्वल पाचमध्येही स्थान पटकावता येत नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची लयलूट करून देणाऱ्या या खेळाला ऑलिम्पिक पात्रतेसाठी झगडावे लागत आहे. इतर संघांच्या मेहरबानीवर कसेबसे आपण ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करतो. केवळ ऑलिम्पिकपटू या शिक्क्यावरच भारतीय संघातील बहुतांश खेळाडू समाधान मानत आहे. ऑलिम्पिक पदक जिंकण्याची त्यांची भूक ही नाहीशी होताना दिसत आहे. पुरुष हॉकी संघाची ही अवस्था असेल तर महिला संघाबाबत न बोललेले बरे. त्यांनी अखेरचा ऑलिम्पिक कधी खेळला हे त्यांनाही आठवत नसेल. पण, हे नकारात्मक चित्र आता बदलताना दिसत आहे.

संघ घडण्यासाठी त्यांची राखीव फळी मजबूत असणे आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला हे आश्वासक चित्र आपल्यासमोर आहे महिला व पुरुष दोन्ही संघांची राखीव फळी उत्साही, गुणवत्तावंत आणि हुशार आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, यात तीळमात्र शंका नाही. या दुसऱ्या फळीबाबत बोलायचे झाले, तर सुलतान जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पध्रेत भारताने उपविजेतेपद पटकावून आपला दबदबा दाखवून दिला. एकामागोमाग दिग्गज संघांना धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. विक्रमजीत सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, बलजित सिंग, आनंद लाक्रा, दिप्सन तिर्की ही भारताची बचावफळी आत्तापर्यंतची कनिष्ठ गटातील सर्वोत्तम मानली जात आहे. त्यांना संता सिंग, मनप्रीत, निलकंता शर्मा, हरजीत सिंग, अजय यादव या मध्यरक्षकांची, तर सुमित कुमार, अरमान कुरेशी, परविंदर सिंग, गुरजंत सिंग, सिमरनजीत सिंग या आघाडीपटूंची साथ आहेच. सुलतान जोहोर चषक स्पध्रेविषयी बोलायचे झाल्यास भारतीय संघाने पाकिस्तान, अर्जेटिना, मलेशिया, ऑस्ट्रेलियासारख्या तगडय़ा प्रतिस्पर्धीवर एकहाती वर्चस्व गाजवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. या सामन्यातील पहिल्याच लढतीत पाकिस्तानचे आव्हान असूनही भारतीय संघाने त्याचे दडपण आपल्यावर येऊ दिले नाही. त्यांनी बिनधास्त खेळ करून विजयी सलामी दिली. हाच बिनधास्तपणा संपूर्ण स्पध्रेत कायम राखत जेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी भारतीय संघ सज्ज झाला.

अंतिम लढतीत त्यांनी ग्रेट ब्रिटनच्या आक्रमणाला अभेद्य बचावभिंतीने रोखले आणि सामना सडन डेथपर्यंत ताणला. निर्धारित वेळेत आणि पेनल्टी शूटआउटमध्ये बरोबरी झाल्यामुळे सडन डेथमध्ये गेलेला हा सामना भारताला गमवावा लागला. मात्र, भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे सर्वाकडून कौतुक झाले आणि ते होणे साहजिकच आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघाने एकजुटीने खेळ केला, ते फार कमी वेळा पाहायला मिळत आहे. वरिष्ठ संघही चांगल्या लयात असला तरी त्यांच्यानंतर भारतीय संघाचे भविष्य मजबूत हातात जाईल हे कनिष्ठ संघाच्या कामगिरीवरून दिसतेच. हे विधान केवळ सुलतान जोहोर चषक स्पध्रेतील कामगिरीवरून करणे चुकीचे ठरेल, परंतु नेदरलँड येथे झालेल्या व्होल्व्हो आंतरराष्ट्रीय स्पध्रेतही भारताची कामगिरी उल्लेखनीय होती. चपळता, आक्रमकता आणि प्रत्येक क्षणी गोल करण्याची संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेल्या या संघाकडून भारतीय क्षेत्राला असेलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भारतीय महिला संघाने रितू राणीच्या नेतृत्वाली तीन दशकानंतर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यांच्यातील हा उत्साह असाच कायम राहिल्यास इतिहास घडायला दिरंगाई होणार नाही. रितू राणी, पूनम राणी, सविता पुनिया, राणी रामपाल, अमनदीप कौर, रेणुका यादव यांनी वरिष्ठ संघाची योग्य रीतीने बांधणी करून भारताला नवी आशा दाखवली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कनिष्ठ संघही यशाकडे वाटचाल करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ महिला आशियाई हॉकी स्पध्रेत याची झलक पाहायला मिळाली. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारताने कोरिया (१३), सिंगापूर (१२) आणि मलेशिया () यांची दैना उडवली. राणी रामपालसह अनुभवी पूनम राणी व अनुपा बार्ला यांनी आक्रमणाची सूत्रे आपल्या हाती ठेवून प्रतिस्पर्धीचा बचाव खिळखिळीत केला. नवजोत कौर, एम. लीली चानू व लिलिमा मिंझ यांनी मधल्या फळीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. दीप ग्रेस एक्का़, नमिता टोप्पो आणि जसप्रीत कौर यांनी अभेद्य बचावाने भारताच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. भारताच्या पारंपरिक हॉकीला नव्या तंत्राची जोड देत हे कनिष्ठ संघ वाटचाल करत आहेत.

इतकी र्वष वरिष्ठ संघांना जे जमले नाही, ते कनिष्ठ संघ करत आहे. पुढच्याला ठेच लागली की मागचा सावध होतो, तशाच प्रकारे वरिष्ठ संघांच्या चुकांमधून बोध घेत कनिष्ठ संघांची वाटचाल सुरू आहे. मात्र, त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि वादविरहित वातावणाची. त्यांना आत्ताच अत्याधुनिक सुविधा पुरवल्यास भारताची मजबूत राखीव फळी निर्माण होईल हे निश्चित. ज्या प्रकारे विदेशी संघ आपल्या मुख्य संघासोबत दुसऱ्या फळीवरही काम करतात, तशाच प्रकारच्या प्रोत्साहनाची आवश्यकता सध्या भारताच्या या कनिष्ठ संघांना आहे. मात्र, या सर्व देत असताना त्यांचे लक्ष विचलित होऊ न देण्याची जबाबदारीही संघटकांना पार पाडावी लागेल. कारण, कनिष्ठ स्तरावर सर्व सुविधा मिळाल्यावर अनेक खेळाडू भरकटतात आणि आहे त्यातच समाधान मानत आपली प्रगती खुंटवतात. तसे होऊ न देण्याची जबाबदारी चोख पार पाडल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल हाती आहे. असे ठामपणे आपण म्हणू शकतो.