डॉ. चारुशीला घोंगडे

हिवाळ्यात गुलाबी बोचऱ्या थंडीसोबतच विविध संसर्गजन्य आजार होतात. जसे सर्दी, खोकला, ताप. तसेच संधीवात, अस्थमा यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे असते. शिवाय या ऋतूत खालवलेल्या तापमानामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी चयापचयाची गती वाढते आणि पचनशक्तीही उत्तम असते. म्हणून या ऋतूत भूकही वाढते.

 हर्बल चहाचे सेवन :

हिवाळ्यात गरम चहा व कॉफी पिण्यास आवडते. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आरोग्यदायी हर्बल चहा घेणे अत्यंत उपयोगी असते. यातून शरीराला शक्तिवर्धक, अ‍ॅन्टीऑक्सिडंट भरपूर मिळतील. यामध्ये तुळशीची पाने, पुदिना, गवती चहा, आले, दालचिनी, हळद, काळी मिरी यांचा उपयोग संसर्गजन्य आजारांचा बचाव करण्यासाठी फायदेशीर असतो.

हंगामी फळांचा व भाज्यांचा आहारात समावेश

मुख्यत: ‘क’ व ‘अ’ जीवनसत्त्व असणारी पेरू, संत्री, मोसंबी, पपई यांसारखी फळे या ऋतूत येतात. यांच्यासोबतच आवळा, बोरे, चिंच यांसारखा रानमेवा शरीरासाठी उत्तम. या हंगामात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हिरव्या भाज्यांसोबतच गाजर, हिरवे वाटाणे यांचा आहारात समावेश असावा. गाजराचा हलवा कधीतरी खाणे योग्य पण कच्चे गाजर सलाड स्वरूपात खाल्ल्यास त्यातून भरपूर ‘अ’ जीवनसत्त्व मिळते.

सुकामेवा व तेलबिया :

बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, काळे मनुके, अक्रोड, डिंक यांचा समावेश आहारात केल्यास यांपासून चांगली चरबी (फॅट्स) वाढण्यास मदत होते. तसेच मुबलक प्रमाणात ई जीवनसत्त्व मिळतात. रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास त्यातील फायटिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होऊन ते शरीरात योग्य प्रकारे शोषले जातात. अळीव, खोबरे, डिंक, खसखसाचे लाडू मधल्या वेळच्या खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ म्हणून उपयोगी असतात. यातून भरपूर लोह व कॅल्शियम शरीराला प्राप्त होते. तिळगुळाची व शेंगदाण्याची चिक्की केल्यास मुलेही आवडीने खातात.

प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा :

रोगप्रतिकारकशक्तीला ‘अ’, ‘क’ , ‘ड’, ‘ई’ जीवनसत्त्वांची व िझक, लोह यांसारख्या खनिजांची आवश्यकता असते. प्रक्रिया केलेल्या मैद्याच्या पदार्थामध्ये या सर्वाची उणीव असते किंवा आवश्यक जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थापेक्षा संपूर्ण व कोंडय़ासहित धान्य, डाळी, कडधान्य यांचा समावेश करावा.