राजेंद्र श्रीकृष्ण भट

गच्चीवर किंवा बाल्कनीत वाफे तयार करताना प्रथम काळे, जाड प्लास्टिक अंथरावे. त्यावर ३ फूट रुंद आणि १२ इंच उंच (३ विटा) आणि आवश्यक त्या लांबीनुसार विटा रचून घ्याव्यात. प्लास्टिकमुळे बाल्कनीत पाणी साचणार नाही आणि इमारतीचे नुकसान होणार नाही. विटांमुळे आजुबाजूने हवा खेळती राहील आणि जास्तीचे पाणी बाहेर पडेल. तळाला कुजण्यासाठी बारीक फांद्या, लाकडाचे तुकडे घालावेत. त्यावर ऊसाचे पाचट आणि सुका पालापाचोळा शक्य तितका बारीक करून घालावा. त्यावर काडीकचरा, कोकोपीट कंपोस्ट भरावे.

ड्रममध्ये झाडे लावताना साधारण २०० लिटरचे जुने, प्लास्टिकचे ड्रम उभे कापून त्याचे दोन भाग करावेत. तळाला शक्य तेवढी छिद्रे पाडावीत आणि ते विटांवर ठेवावे. लाकडाचे तुकडे, काडीकचरा आणि नारळाच्या शेंडय़ा शक्यतो तळाशी भराव्यात त्यावर माती आणि खतांचे मिश्रण भरावे. या मिश्रणात दोन-तीन चमचे ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी पावडर मिसळावी. त्यामुळे हानीकारक बुरशी वाढत नाही. रुईच्या पानांमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फुरद (फॉस्फेट) असते. त्यामुळे वाळवी वाढत नाही. ही पाने कुजल्यावर मुळे, खोड, फुलांसाठी आवश्यक अन्नघटक मिळतात.

या मिश्रणात पाव किलो कडुनिंबाची पेंड आणि पाव किलो बोनमील (हाडांचा चुरा) मिसळावे. अशा प्रकारे ड्रम पूर्ण भरून त्यावर पाणी देण्यास सुरुवात करावी. पाणी तळातील छिद्रांतून बाहेर येणार नाही एवढेच द्यावे.  १०-१५ दिवसांत मिश्रण खाली बसते. त्यानंतरच ड्रममध्ये बिया अथवा रोपे लावावीत.

या मिश्रणाला ओलावा मिळाल्यानंतर त्यातील सेंद्रिय घटक कुजण्यास सुरुवात होते. कुजण्याच्या प्रक्रियेत उष्णता निर्माण होते. ती १०-१५ दिवसांत कमी होते. त्यानंतरच रोपे लावावीत किंवा बियाणे पेरावे. बी पेरण्याच्या किंवा रोपे लावण्याच्या दोन दिवस आधी पाणी देणे बंद करावे. बी किंवा रोपे लावल्यावर हलके पाणी द्यावे. रोपे शक्यतो संध्याकाळी लावावीत.