डॉ. स्वाती विनय गानू

सध्या शैक्षणिक परीक्षांचे दिवस आहेत. परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचीही चिंता वाढू लागते. पाल्यावर अपेक्षांचे ओझे टाकले जाते. परीक्षेचे योग्य नियोजन केल्यास त्यातून नक्की यश मिळू शकते.

एसएससी, एचएससी किंवा अन्य बोर्डाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या की, शाळा-महाविद्यालयांत एक भीषण शांतता पसरते. वातावरणात गांभीर्य जाणवायला लागते. ग्रंथालयात पुस्तकं  घेणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागते.  समुपदेशन घेणाऱ्यांचीही संख्या वाढते. परीक्षेला आता एक-दीड महिनाच राहिला अशा गोष्टींची मुलांच्या ग्रुपमध्ये आणि अर्थातच पालकांच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाते. आयुष्याला नव्या वळणावर घेऊन जाणाऱ्या परीक्षांच्या तारखा ठरलेल्या असतात. पण आपला अभ्यास मात्र वेळापत्रक सोडून इतस्तत: पसरलेला असतो. शाळा-महाविद्यालयांना शंभर टक्के निकाल हवा असतो. विद्यार्थ्यांना वाटत राहतं की या सगळ्यांच्या जशा अपेक्षा आहेत तशा आमच्या स्वत:च्याही स्वत:कडून काही अपेक्षा आहेत ना!

आज मोठं झाल्यावर महाविद्यालयाच्या, कार्यालयाच्या, आयुष्याच्या परीक्षा देताना दहावीची-बारावीची परीक्षा किती छोटीशी आणि सोपी वाटते. मग या परीक्षेचा बागुलबुवा करून भीती निर्माण करण्यापेक्षा, घाबरण्यापेक्षा परीक्षा सोपी असते. फक्त आपला अभ्यास तयार असायला हवा, असा दृष्टिकोन पाहिजे. मुळात परीक्षा ही पालक, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासाठी नाही तर स्वत:साठी देतोय हे भान मुलामुलींना द्यायला हवे. लोक काय म्हणतील यापेक्षा ‘मी मला काय म्हणतो’ हे महत्त्वाचे असते हा विचार करायला त्यांना शिकवायला हवे. कारण प्रत्येक मुलाचे आपले असे एक स्वप्न असते आणि आपण त्याला हे स्वप्न द्यायचे असते.

अशी स्वप्नं मनाशी घेऊन जगताना ती उघडय़ा डोळ्यांनी पाहायला हवीत, असे आम्ही समुपदेशन करताना शिकवतो. ज्याला व्हिज्युलायझेशन तंत्र किंवा कल्पना करणे म्हणतो. विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा प्रवास किती प्रेरणादायी असू शकतो हे सारे एखाद्या गोष्टीसारखे शब्दात बांधलेले असते. या प्रवासाची जी साखळी असते, त्या साखळीमधल्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी स्वत: काही ना काही सकारात्मक कृती करत असतो. एक एक पायरी पुढे जात असतो. आपण अभ्यास करतोय, प्रश्नपत्रिका सोडवतोय, यशस्वी होतोय, चांगले गुण मिळताहेत, सगळे जण कौतुक करताहेत. आई-बाबांच्या डोळ्यातलं कौतुक, मित्रमंडळी, नातेवाईक यांचे कौतुक शिक्षकांना वाटणारा अभिमान हे या ‘व्हिज्युलायझेशन तंत्रा’च्या अनुभवातून घेतात. जसं आपल्यासारख्या सामान्य लोकांना चिंच पाहिली की तोंडाला पाणी सुटतं, पण नुसतं चिंचेचं वर्णनही तोंडात पाणी आणतं तसेच हे तंत्र मुलांना त्यांच्या स्वप्नाचं एव्हरेस्ट शिखर दाखवतं. काहींना वाटेल नुसते स्वप्नरंजन करून थोडेच गुण मिळणार, पण स्वप्न नव्हे तर ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी पाहिलं की तशी विचारप्रक्रिया ते करू शकतात. विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मग कृती करण्याची प्रेरणा मिळते.

आणखी एक प्रश्न मुलांना भविष्यात घेऊन जातो. ५-७ वर्षांनंतर तू स्वत:ला कुठे पाहतोस किंवा पाहतेस? स्वत:बद्दल असा प्रश्न, असा विचार फारवेळा मुले करत नाहीत. मात्र असा विचार केल्यानंतर मुलं तिथे पोहोचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर कठोर परिश्रम करायला परावृत्त होतात. जसे आयडॉल मुलांसमोर असतात. त्यांनी केलेला संघर्ष, कष्ट पाहून, वाचून मुलंही स्वत:बाबत आपणही असे करत राहिलो तर नक्कीच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास मिळवतात.

यासाठी मुलांना छोटी-छोटी उद्दिष्टे देता येतात. मोठे यश किंवा गुण मिळवण्यासाठी लहान पायऱ्या किंवा लहान ध्येय खूप फायद्याची ठरतात. अभ्यासाचे छोटे-छोटे भाग करून ते पूर्ण केले की चिंता राहात नाही. अभ्यासातही कधी लेखन, कधी वाचन कधी पाठांतर तर कधी फिगर ड्रॉ करणे असे वैविध्य कंटाळा येऊ  देत नाही. विविध प्रकारे केलेला अभ्यास आत्मविश्वास देतो. अभ्यासाची वेळ अर्धा तास, एक तास, दोन-तीन तास अशी वाढवता येते. शेवटी यश मिळायला लागले की हुरूप येतो. यश मग ते विटीदांडूतल्या खेळातले असो की विधानसभेतल्या निवडणुकीचे. यशासारखं यशच असते, दुसरे काही असत नाही. म्हणूनच नुसता अभ्यास करायचा असे म्हणण्यापेक्षा तो कसा करायचा याचंही चिंतन करायला हवे तरच स्वप्नांचा पाठपुरावा करता येईल. कारण असं म्हणतात की, Difficult roads lead to beautiful destinations ते खरंच आहे नाही का?