डॉ.अमोल देशमुख

परीक्षांचा काळ सुरू झालाय आणि या काळात जवळपास सर्वच विद्यार्थी तणावाच्या अवस्थेतून जातात. दहावी आणि बारावीत असलेल्या मुलांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून राहते. मित्रांनो, अल्पसा ताण आपल्याला परीक्षेची तयारी आणि परीक्षा व्यवस्थित देण्यासाठी मदतच करत असतो. परीक्षेला सामोरे जाताना ताण येणे साहजिकच आहे. आलेला अल्पसा ताण अति तर होत नाही ना यावर लक्ष ठेवून अशा काळात तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

तणावाचे व्यवस्थापन केल्याने आपण परीक्षेत स्वत:ची सर्वोच्च कामगिरी करू शकतो. ताण अधिक प्रमाणात वाढल्यास परीक्षेच्या काळजीमुळेच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, एकाग्रता होत नाही, चिडचिड होते, त्यांची झोप उडते आणि ते निराश होतात. अशा काळात, परीक्षा चांगली जाईल का, मार्क चांगले मिळतील का, माझ्यात काही कमी तर नाही, कमी मिळाले तर पुढे काय, घरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, असे बरेच प्रश्न मनाला चाटून जातात आणि विद्यार्थी त्यामुळे बरेचदा अस्वस्थ होतात.

परीक्षेची तयारी करत असताना आपले लक्ष स्वत:च्या नियंत्रणातील घटकांवर म्हणजेच परीक्षा देण्यावर आणि अभ्यासाच्या निरोजनावर असावे. अशाने निकाल कसा जारी लागला तर तो स्वीकारण्याची मानसिक तयारी वाढते. लक्ष जर निकालावर किंवा मार्कवर असेल तर लक्ष विचलित होते आणि अभ्यासातला आनंद उपभोगता येत नाही.

माझा अभ्यास चांगला झालाच पाहिजे, अभ्यास करताना मजा आली तरच मी तो करेन या प्रकारचे अविवेकी दृष्टिकोन घातक असतात. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाकाळाची परिस्थिती खरोखरच आवडत नाही, कारण त्या काळात अस्वस्थता निर्माण होते. अनेक विद्यार्थ्यांना अशी परिस्थिती नकोशी असते. परिस्थिती कितीही न पटणारी अत्यवस्थ करणारी असली तरीही ती परिस्थिती आपण सहन करू शकतो. जेव्हा आपण ती परिस्थिती सहन करू शकतो, असं स्वत:च्या मनाला म्हणतो तेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतो. आपल्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत बदल कसा घडवून आणायचा या दिशेने विचार करत असतो. त्यासाठी परीक्षाकालीन परिस्थितीत सहनशीलता वाढवणे गरजेचे आहे. परीक्षेपासून दूर जाण्यापेक्षा परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरते कारण जितका अधिक काळ आपण कठीण परिस्थितीत राहू, परिस्थितीशी मुकाबला करू तेवढेच आपण कणखर होत जातो.

बरेचदा खूप अभ्यास करूनही आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून विद्यार्थी अस्वस्थ होतात त्यामुळे अजून अभ्यासावर परिणाम करतो. विद्यार्थ्यांची अशी समजूत असते की चांगले गुण मिळाले तर आपण चांगले आणि कमी गुण मिळाले तर आपण कुचकामी किंवा अपूर्ण व्यक्ती आहोत, असा अनेकदा स्वत:वर शिक्कामोर्तब करतात. अशा प्रकारची शिक्केबाजी केल्याने अजूनच तणावांमध्ये भर पडते आणि तणाव नियोजनाचा मार्ग आपल्याला सुचत नाही. एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश मिळाले म्हणजे आयुष्यात अपयश मिळेल असा अर्थ होत नाही हे मुलांनी आणि पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. जर परीक्षेत अपशय आले तर अपयशाची जबाबदारी घेण्यास, पर्यायी विचारसरणी वापरण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी शिकवल्यास अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य वाढते. अशा काळात तणावाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्यास समुपदेशकाची आणि मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरते.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये प्राधान्यक्रम आणि वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशा काळात अभ्यास, खेळ, टीव्ही पाहणे आणि इतर बाबी यांमध्ये योग्य ती वेळेची विभागणी करून प्राधान्याचा उतरता क्रम लावणे गरजेचे आहे. पण हे करत असताना मुलांनी स्वत:चा आहार, पुरेशी झोप आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी जेणेकरून त्यांचा एकंदरीतच उत्साह आणि क्षमता वाढते.