|| डॉ. अविनाश भोंडवे

मूतखडा किंवा किडनी स्टोन या आजाराने माणसांना अनेक वर्षांपासून पिडलेले आहे. इजिप्तमध्ये पुरातनकालीन ममीजमध्येही त्याचे अस्तित्व दिसून आले आहे. हिपोकॅट्रिक प्रतिज्ञेमध्येसुद्धा, ‘मी मूतखडय़ाच्या प्राणांतिक वेदनांनी तळमळणाऱ्या रुग्णावर विनाकारण शस्त्रक्रिया करणार नाही..’ असा उल्लेख आहे.

मूतखडा कसा तयार होतो?

रक्तातले टाकाऊ आणि शरीराला आवश्यक नसणारे पदार्थ मूत्रावाटे उत्सर्जित करणे हे मूत्रपिंडांचे कार्य असते. जेव्हा हे टाकाऊ  पदार्थ मूत्रपिंडात साचून राहातात तेव्हा त्यांचा कठीण, कडक स्वरूपाचा गोळा बनतो. अशा रीतीने मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मूतखडा म्हणतात. मूत्रातल्या टाकाऊ  पदार्थानी बनलेला हा गोळा दगडासारखा टणक असतो आणि आकाराने कधी मोहरीएवढा छोटा तर कधी एखाद्या आवळ्याएवढा मोठा आणि गरगरीत असू शकतो. मूतखडा मूत्रपिंडात तयार होतो आणि तो एकतर तिथेच अडून राहतो किंवा मूत्रनलिकेतून, मूत्राशयातून आणि त्यापुढच्या मूत्रमार्गातून बाहेर पडतो. मात्र त्याचा आकार मूत्रनलिकेच्या आतील व्यासापेक्षा जास्त असेल तर तो मूत्रनलिकेत अडकून बसतो. असा अडकलेला खडा खूप वेदनादायी असतो.

लक्षणे

  • सुरुवातीला मूतखडय़ाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु मूत्रमार्गात तो सरकू लागल्यास किंवा अचानक अडथळा निर्माण झाल्यास तीव्र वेदना सुरू होतात. या वेदना मूतखडा ज्या बाजूला असेल, त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात होतात.
  • लघवी लाल रंगाची होते.
  • मूतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर पुन्हा पुन्हा लघवी आल्याची संवेदना होते
  • लघवी होताना जळजळ होते.
  • लघवीत जंतुसंसर्ग होऊन थंडी-ताप येतो.

निदान

  • लघवीच्या तपासणीत ती लालसर दिसते, ती आम्ल गुणधर्माची असते, त्यात मूतखडय़ाची खर, कॅल्शियम आणि ऑक्झेलेटचे स्फटिक आढळू शकतात.
  • रुग्णाच्या पोटाची सोनोग्राफी केल्यास खडा आहे किंवा नाही, असल्यास त्याचा आकार काय आहे, तो कोठे आहे, त्याचे आकारमान तो निघून जाण्यासारखे आहे का याचे निदान होऊ शकते.
  • पोटाचा एक्स-रे केल्यावर अपारदर्शक मूतखडे दिसू शकतात. शिरेतून इंजेक्शन देऊन मूत्रसंस्थेची प्रतिमा घेतली जाते. यात अडकलेले अपारदर्शक खडे अचूकपणे सापडतात.
  • अडकलेल्या मूतखडय़ासाठी सिस्टोस्कोपी केली जाते.

प्रतिबंध

अनेकदा हे खडे ऑक्झेलेट या क्षाराने बनलेले असतात. त्यामुळे ज्या पदार्थात ऑक्झेलेटचे प्रमाण जास्त असणारे म्हणजे पालक, टोमॅटो, कांदा, लसूण, अळूची भाजी हे अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत. दिवसातून २-३ लिटर पाणी प्यावे. मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग असल्यास त्वरित औषधोपचार करावा. आहारातून लहान दगड किंवा खडे खाल्ले गेले, वांगी, भेंडी यांसारख्या बिया असलेल्या भाज्या खाण्यात आल्या तर त्रास उद्भवतो असा काही जणांचा समज असतो आणि तो चुकीचा आहे.

उपाय

  • मूतखडा छोटा असल्यास लघवीवाटे पडून जातो. ८० टक्के छोटे खडे आपल्याला कसलीही जाणीव न देता पडून जातात. आपल्याला त्यांचा त्रास तर होत नाहीच आणि मूतखडा पडून गेल्याचे जाणवतही नाही. काही मूतखडय़ांनी वेदना होतात पण तेही लघवीवाटे पडून जातात.
  • मूतखडा पडताना होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी औषधांचा उपयोग होऊ शकतो.
  • खडा विरघळणे किंवा पडून जाणे हे निसर्गत: घडते. यासाठी भरपूर पाणी प्यायल्यास तयार होणाऱ्या लघवीच्या दबावाने तो पडू शकतो.
  • काही काळ वाट पाहून, भरपूर पाणी पिऊनही खडा पडलाच नाही आणि दुखण्याचा त्रास कमी झाला नाही, तर त्यांचा मूत्रपिंडांवर परिणाम होतो. त्यासाठी दुर्बिणीच्या साहाय्याने सिस्टोस्कोपी करून तो काढला जातो.
  • मूत्रपिंडामध्ये जर एक इंचापर्यंत मोठा खडा असल्यास तो खडाफोड या ‘साउंड वेव्हज’च्या साहाय्याने कार्य करणाऱ्या यंत्राद्वारे फोडला जातो. याला लिथोट्रिप्सी म्हणतात. खडय़ांचा चुरा झाल्याने ते बाहेर पडण्यास मदत होते.