घरात असे अनेक डबे, टय़ूब, खोके येतात ज्यांच्या आतील वस्तू संपल्यानंतर ते कचऱ्यात किंवा भंगारात जातात. थोडीशा कलात्मकता दाखवली तर अशा भंगार सामानाचा किंवा टाकाऊ वस्तूंचाही पुनर्वापर करता येतो.

त्यातून सुंदर आणि उपयुक्त वस्तू बनवता येतात. रक्षाबंधन, भाऊबीज, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात आरतीसाठी किंवा ओवाळण्यासाठी निरंजनाला अनन्यसाधारण महत्त्व असते.

दिवा ठेवण्यासाठी सुशोभित तबके किंवा बैठक बाजारात विकत मिळते. मात्र त्यांच्या किमती प्रचंड असतात. घरातील भंगार साहित्यापासून असे काही तयार करता आले तर? पाहू या..

साहित्य

टूथपेस्टची दोन झाकणे, बिस्किट किवा प्रीन्गल्सच्या डब्यातील गोल चकती (चौकोनीही चालेल), पिस्त्याची टरफले, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगकामाचे साहित्य, टिकल्या, गम.

कृती

  • गोलाकार पुठ्ठय़ाच्या वरील स्टीकर काढा व खडबडीत बाजूस अ‍ॅक्रेलिक रंगाने रंगवा. रंग नीट वाळू द्या.
  • टूथपेस्टच्या दोन झाकणांत वरील बाजूच्या खोलगट भागात मावेल तेवढा गम भरा आणि ही झाकणे आधीच रंगवलेल्या पुठ्ठय़ाला चिकटवा. वाळू द्या.
  • रंगवलेल्या गोलाकार बैठकीचे सुशोभन करण्यास पिस्त्याची टरफले वापरा, टरफले अ‍ॅक्रेलिक रंगांनी रंगवा, टिकल्या चिकटवून बैठक सुशोभित करा.
  • दिवा किंवा घरातील छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठी ही ठेंगणी बैठक वापरता येईल. उदा- निरंजन, घंटा, पंचपाळे इत्यादी कमी वजनाचे पूजा साहित्य.
  • चौकोनी चकत्या असल्यास ४ किंवा ६ बनवून कोस्टर म्हणूनही वापरता येतील. ही कलाकृती भेटवस्तू म्हणूनही देता येऊ शकते.

apac64kala@gmail.com